--
भोर : भोर शहरातील नागरिकांसाठी उपजिल्हा रुग्णालयात सुरु असलेले लसीकरण केंद्र शहरापासून लांब अंतरावर आहे. यामुळे लोकांना जाण्याची येण्याची मोठी अडचण होत आहे. याचा वृद्ध नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र भोर नगरपलिकेत किंवा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सुरु करावे आणि लसींची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. भोर नगरपालिका आणि तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
भोर शहराची लोकसंख्या सुमारे १८ हजार असून, शहरातील नागरिकांसाठी उपजिल्हा रुग्णालय रामबाग येथे लसीकरण सेंटर सुरु करण्यात आले आहे.
मात्र येथे दररोज केवळ पन्नास, शंभर किंवा जास्तीत जास्त लसीच येतात. लोकसंख्येच्या तुलनेत येणाऱ्या लसी अत्यंत कमी आहेत. त्यामुळे रोज ५०० किंवा त्यापेक्षा अधिक लसी मिळायला हव्यात, तरच थोड्या फार प्रमाणात शहराचे लसीकरण पूर्ण होईल, अन्यथा अजून दोन वर्षे लागतील अशी चर्चा सुरू आहे. याशिवाय येथील नियोजनाचा अभाव अपुऱ्या लस यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे भोर नगरपालिकेत किंवा शहरात मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी वारंवार नागरिक करीत आहेत.
मात्र, याकडे भोर नगरपालिका व आरोग्य विभाग व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरु आहे. मात्र लसीकरणाचा सावळा गोंधळ असून नागरिक सकाळी ५ वाजल्यापासून प्रतीक्षेमध्ये असतात, तर येथील कर्मचारी, होमगार्ड, पोलीस ९.४५ वाजता हजर होतात. आरोग्य कर्मचारी ९.३० वाजता येतात. येथे काम करणारे शासकीय कर्मचारी सोडून इतर नागरिक लसीकरणासाठीच्या चिठ्या वाटतात, लसी अपुऱ्या असल्याने अनेकांना लस न घेताच रिकाम्या हाताने परत जावे लागते. लसीकरणासाठी होणाऱ्या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची भीती येथील नागरिक व्यक्त करतात, याला जबाबदार कोण, असा सवालही करीत आहेत. अनेकदा डोस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेताच जावे लागत आहे. यात वृध्द नागरिकांचे हाल होत आहेत.
--
चौकट
--
८४ दिवस उलटून गेले तरी दुसरा डोस मिळाला नाही
भोर शहरासह ग्रामीण भागातही अशीच अवस्था
भोर शहरातील लसीकरण केंद्र लांब असून अपुऱ्या डोस आहेत. यामुळे अनेकांना लस मिळतच नाही. काहीशी अशीच अवस्था ग्रामीण भागातील नेरे, आंबवडे, हिर्डोशी, नसरापूर, जोगवडी, भोंगवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे.
अनेकांना पहिला डोस देऊन ८४ दिवस झाले तरी अद्याप दुसरा डोस मिळालेला नाही. अनेकांना मेसेज येत नाहीत.
अशा प्रकारे आरोग्य विभागाचा गोंधळ सुरू आहे.