लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गीतरामायणाने रसिकमनांवर अधिराज्य गाजवून एक अजरामर काव्यकलाकृतीमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. अशा प्रकारे महाभारतावरदेखील सुंदर काव्य होऊ शकते, याच प्रेरणेतून अमेरिकेतील लॉस एंजलीस येथे राहणारे शशिकांत पानट यांनी व्यासांनी लिहिलेल्या महाभारताच्या कथानकावर गीतलेखन करण्याचे शिवधनुष्य पेलले. महाभारतावर गीत लिहिण्याचा प्रयोग आजपर्यंत एकाही भारतीयाने केलेला नाही. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या गीतांवर आधारित ‘गीत महाभारत’ हा सांगीतिक कार्यक्रम येत्या १९ व २० जून रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रात्री ९.३० वाजता रंगणार आहे. पुराणातल्या कथानकाची ओढ परदेशी राहणाऱ्या भारतीयालाही वाटल्याने ४३ वर्षे अमेरिकेत राहणारे शशिकांत पानट यांनी गीतरामायणातील गीतांमुळे प्रेरित होऊन महाभारतावर आधारित कथानकांवर ही गीते लिहिली. महाभारतातल्या कथानकांचा ६ वर्षे अभ्यास करून मूळ कथानकांच्या आधारावर पानट यांनी ५७ गीतांची पहिली आवृत्ती २००७मध्ये प्रकाशित केली. त्यामुळे या गीतांविषयी रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण होऊ लागली. गीत महाभारताचा पहिला कार्यक्रम गोव्यात झाला. या अनोख्या आणि नावीन्यपूर्ण प्रयोगाला तब्बल दीडशे लिखित प्रतिक्रियाही मिळाल्या असल्याचे शशिकांत पानट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गीत महाभारताचे महाराष्ट्राबाहेर पाच प्रयोग झाले आहेत. या गीतांना कार्यक्रमातील रसिकांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे पानट यांनी आणखी काही कथानकांवर गीते लिहून या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत रूपांतरित केले आहे. या आवृत्तीत आता ६१ गीते प्रसिद्ध झाली. या गीतांचा समावेशही कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या गीतांना गोव्यातील प्रसिद्ध गायक गौरीश तळवलकर यांनी स्वरबद्ध केले आहे. गीत महाभारत या सांगीतिक कार्यक्रमात गायिका सुवर्णा माटेगावकर व गौरीश तळवलकर यांचा सुरेल आवाज ऐकायला मिळणार आहे.
‘गीत महाभारत’ पुण्यात रंगणार
By admin | Updated: June 13, 2017 04:25 IST