शेलपिंपळगाव : बहीण-भावाचे नाते नदीच्या प्रवाहाप्रमाणे आयुष्यभर एकमेकांसोबत राहणारे असते. बहीण- भावाचे नाते सावली देणारे झाड. आयुष्याच्या वाटेवर चालताना सोबत असणारे धिराचे गाठोडे असते. बहीण-भावाचे नाते कधीही न तुटणारे, तसेच एकमेकांशिवाय अपुरे असते. म्हणूनच तर बहीण भावाचे नाते सागराहूनही खोल असते. कारण दोघांपैकी कोणावरही संकट उभे राहिले तर, ते एकमेकांच्या मदतीला धावून येतात. अशाच बहीण-भावाच्या घट्ट नात्याच्या प्रत्यय खेड तालुक्यातील वाडा गावात आला आहे. आपल्या भावावर आजार ओढवल्याने यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता निर्माण झाली अन् कुठलाही विचार न करता बहिणीने आपले यकृत भावासाठी दान केले आहे.
वाडा-पावडेवाडी (ता. खेड) येथील शेतकरी गरीब कुटुंबातील होमगार्ड पथकातील कुणाल ऊर्फ कृष्णा दिलीप पावडे या बावीस वर्षीय तरुणाला कर्तव्य बजावत असताना कावीळ आजाराने ग्रासले. मात्र, काही दिवसांतच आजाराने गंभीर रूप धारण केले. कृष्णाला उपचारासाठी पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित डॉक्टरांनी कृष्णाची किडनी व यकृत खराब झाल्याचे सांगून तत्काळ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने १५ ते २० लाख रुपयांचा अपेक्षित खर्च सांगितला.
वास्तविक कृष्णाच्या घरची आर्थिक परिस्थिती एकदम हलाकीची असल्याने हा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. मग एवढी मोठी रक्कम कुठून आणायची ? हा प्रश्न त्याच्या कुटुंबासमोर उभा राहिला. गावातील तरुणांनी, मित्रांनी, गावकऱ्यांनी, तसेच कुटुंबातील सदस्यांनी कृष्णाच्या उपचारासाठी सोशल मीडियावर मदतीची साद घातली. त्यातून समाजातील असंख्य मदतीचे हात पुढे आले आहेत. आजपर्यंत अंदाजे ९ ते १० लाख रुपयांची मदत गोळा झाली आहे.
दरम्यान, कृष्णाची बहीण रेणुका महिंद्रा शिंदे (वय ३२ रा. पापळवाडी, ता. खेड ) हिने आपल्या भावाला यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. कृष्णाच्या दोन बहिणींपैकी रेणुकाचे यकृत प्रत्यारोपणासाठी जुळल्यानंतर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. यकृत प्रत्यारोपणानंतर बहीण रेणुका सुखरूप आहे. शेतकरी कुटुंबातील रेणुकाने आपल्या भावासाठी व त्यांचे पती महिंद्रा यांनी मेहुण्यासाठी बायकोला परवानगी स्वागतार्ह दिल्याने दोघांच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कुणाल ऊर्फ कृष्णा पावडे
२) रेणुका शिंदे