खडकवासला : शिवराय व त्यांच्या सहकारी मावळ्यांनी दुर्गदिनाचे औचित्य साधून आज (रविवारी) कोंढाणा किल्ला पुन्हा एकदा प्रतीकात्मक पद्धतीने जिंकला व जिंकलेला हा कोंढाणा अर्थातच सिंहगड यापुढच्या काळात शिवप्रेमी, दुर्गप्रेमी व पर्यटकांच्या स्वाधीन केला. आता शिवभक्तांनीच त्याचे रक्षण करावे, असे •आवाहनही या वेळी केले. हा ऐतिहासिक क्षण आज इतिहासप्रेमी मंडळाने आयोजित केलेल्या गडजागरण मोहिमेमुळे पाहावयास मिळाला. पुणे येथील इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने दुर्गदिन व दुर्गमहर्षी गोपाल गणेश नीलकंठ दांडेकर यांच्या पुण्यतिथीचे निमित्त साधून गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच्या मिरवणुकीने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्ट्याच्या प्रात्यक्षिकांनी पर्यटकांच्या डोळ्यांची पारणे फिटली. शेकडोंच्या संख्येने मावळ्यांचा वेष परिधान करून आलेले युवक-युवती या कार्यक्रमाचे खरे आकर्षण ठरले. खास मराठमोळ्या नऊवारी साडीतील महिला, डोक्यावर दुधाची घागर घेऊन, तर काही जणी डोक्यावर पाटी घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या. या वेळी तलवारबाजीचे प्रदर्शन करण्यात आले. इतिहासातील शोभेल अशा वेशातील शेकडो युवक-युवतींच्या गडावरच्या दिवसभरातील वावरामुळे शिवरायांचा तो जुना इतिहासकाळच प्रत्यक्ष जिवंत झाला होता. इतिहासप्रेमी मंडळाच्या या उपक्रमाबाबत प्रमुख पाहुण्या म्हणून सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी होत्या. (प्रतिनिधी)
सिंहगडावर रंगला तलवारबाजीचा थरार..!
By admin | Updated: June 2, 2014 00:48 IST