शिवप्रसाद डांगे, रहाटणी - शहरातील मोजके चौक सोडल्यास इतर चौकांत वाहतूक पोलीस असून नसल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे बहुसंख्य चौकांमध्ये सामूहिकपणे वाहनचालक सर्रास सिग्नल तोडताना दिसतात. ज्या चौकाच्या एका कोपर्यात सावलीत पोलीस उभे असतात तो मार्ग सोडल्यास इतर मार्गांवरील वाहने लाल दिवा सुरू असतानाही दामटली जातात. वाहतूक पोलिसांच्या अपुर्या संख्येमुळे सामूहिकपणे सिग्नल तोडणार्यांची संख्या आणि तेथील अपघाताची संख्या वाढत आहे. विविध चौकांमध्ये सिग्नलवर नियमाचे पालन अनेक वाहनचालक करीत नाहीत. लाल दिवा लागल्यावर काही सेकंदही थांबण्याची तसदी अनेक वाहनचालक घेत नाहीत. कोणत्या तरी मार्गाने सिग्नल तोडून सर्वांच्या पुढे निघून जाण्याचा वाहनचालकांचा प्रयत्न असतो, तर काही वेळा लालदिवा सुरू असताना बिनधास्त वाहन घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना अपघात होतात. यात चूक नसताना दुसर्या वाहनचालकांना अपघातास सामोरे जावे लागते. सिग्नलवर उभे असताना पुढे जाण्याच्या अतिघाईमुळे भांडणाचे प्रकारदेखील घडत असतात. सिग्नल सुरू असताना मागे उभे राहून सारखे हॉर्न वाजविणे, वाहनांना कट मारून पुढे जाण्याच्या घाईत दुसर्या वाहनांना धक्का लागणे असे प्रकार सर्रास होतात. अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, एका वाहनावर कारवाई करीत असताना काही वाहनचालक सिग्नल तोडून सर्रास निघून जातात. काही वेळा वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेतात. अनेकवेळा वाहतूक पोलीस सावलीचा आडोसा घेऊन उभे असतात. एका कोपर्यात उभे असलेल्या पोलिसासमोरून वाहनचालक सिग्नल तोडून गेले, तरी पोलीस काणाडोळा करतात. काही कर्तव्यदक्ष पोलीस जबाबदारी चोख बजावत असतानादेखील काही टारगट त्यांच्यासमोर सिग्नल तोडून जातात. मात्र सिग्नल तोडल्याची माहिती पुढील चौकातील पोलिसांना दिली जात नसल्याची माहिती काही जाणकार सांगतात. काही तरुण मुद्दाम सिग्नल तोडताना दिसतात. काही ठिकाणी वाहतूक पोलीस सिग्नलवर थांबण्याच्या सूचना देतात. मात्र, वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करीत भरधाव निघून जातात. एकाच वेळी अनेक वाहने सिग्नल तोडत असल्याने चौकात हजर असणारे वाहतूक पोलीस देखील हतबल होत आहेत. नाममात्र दंड; भिती कुणाला? सिग्नल तोडताना एखादा वाहनचालक वाहतूक पोलिसांच्या हाती लागला तर त्याच्यावर कारवाई होते. अनेक वेळा तर पोलीस कारवाई करू लागले की, पोलिसांवर दबाव आणून वाहन सोडवून घेतले जाते. परंतु जर दंड असलाच तर १०० किंवा २०० रुपये होतो. दंडाची भीती चालकांना वाटत नाही. सध्या तरुणांना १००, २०० रुपये तुटपुंजे वाटत असल्याने त्यांचे धाडस वाढलेले दिसून येत आहे. अनेक वेळा तर सिग्नल तोडून जाणार्या वाहनांचा नंबरही दिसून येत नाही. अनेक वाहनांना स्टायलिश नंबरप्लेट असते. असेच वाहनचालक कोठेही न थांबता भरधाव निघून जातात म्हणून नंबर नोंदवणेसुद्धा वाहतूक पोलिसांना अवघड जाते.
सिग्नल तोडतात बिनधास्त
By admin | Updated: May 24, 2014 05:16 IST