- नम्रता फडणीस, पुणे ‘ती’ने कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रे पादाक्रांत करीत जागतिक स्तरावर स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. तिने मुक्त ‘भरारी’ तर घेतलीच; पण ‘व्यक्त’ होण्याचे तिचे अवकाश संकुचित झाले. तिचे सामाजिक, आरोग्य प्रश्न तिच्यापुरतेच सीमित राहिले; पण आता तिलाही व्यक्त होण्यासाठी, तिचे प्रश्न समजून तिला मानसिक उभारी आणि पाठबळ देण्यासाठी निर्माण झालेय ‘वुमनविश्व’ हे एक हक्काचे व्यासपीठ! महिलांना हक्काची जाणीव करून देणारा ‘संतती नियमन दिन’ही साजरा करीत तिच्या व्यक्त होण्याला एक व्यापक स्वरूप देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. या संकेतस्थळाविषयी कनकने ‘लोकमत’ प्रतिनिधीशी संवाद साधला. ती म्हणाली, ‘‘सध्याचं युग हे बदलांचं युग समजलं जातं. बदल हा कोणत्याही क्षेत्रातील प्रगतीचा महामंत्र मानला जातोय; पण या बदलत्या जगातही काही गोष्टी अजूनही स्थितिशील आहेत. महिला विश्वाचा एक मोठा भाग यात समाविष्ट होतो. त्यांच्या जन्माला येण्यापासूनच त्यांच्यावर बंधनं घातली जातात. त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेतले जातात. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आत्मसन्मानाने जगण्याचा नैसर्गिक अधिकार त्यांना नाकारला जातोय. ही परिस्थिती बदलायची असेल, तर त्यांना स्वतंत्र होणं गरजेचं आहे. स्वातंत्र्य हे सक्षमतेतून येतं.’’प्रश्नांवर उत्तरे शोधणारआपण जर ग्लोबल झालो तर आपण सक्षम होणार आहोत. ग्लोबल होणे म्हणजे केवळ आधुनिक वस्तूंचा वापर करणे नव्हे, तर आधुनिक कल्पनांचा, विचारांचा अंगीकार करणे आणि त्यानुसार आपल्या स्वातंत्र्याचा उद्घोष करणे होय. नव्या जगातील ग्लोबल ट्रेंड्स, नवीन करिअरच्या संधी, व्यवसाय उद्यमशीलता याचबरोबर महिलांचे सामाजिक प्रश्न आणि त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आम्ही वूमनविश्व या संकेतस्थळाच्या माध्यमातून करीत आहोत. नव्या जगातील ग्लोबल ट्रेंड्स, नवीन करिअरच्या संधी, व्यवसाय उद्यमशीलता याचबरोबर महिलांचे सामाजिक प्रश्न आणि त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या संकेतस्थळाच्या माध्यमातून केला जातोय. तीन तरुणींनी www.womenvishwa.com हे संंकेतस्थळ सुरू करून महिलांसाठी संवादाचे हे दालन खुले केले आहे, हे त्याचे विशेष! मूळ परभणीची, पण सध्या मुंबई येथे यूजर इंटरफेस डिझायनर म्हणून कार्यरत असलेली कनक वाईकर संस्थापिका आहे. वर्षा गायकवाड (संपादिका) आणि श्रुती गुप्ता (तंत्रज्ञान तज्ज्ञ) या आपल्या मैत्रिणींच्या सहकार्याने या संंकेतस्थळाला तिने मूर्तरूप दिले आहे. महिलांनी मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी, त्यांचे प्रश्न, स्वप्ने यांना पाठबळ देण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करणे या स्वप्नांसहित आम्ही हे संकेतस्थळ निर्माण केले आहे. ज्या महिलांची घुसमट होत आहे, ज्यांना व्यक्त व्हायचे आहे; पण व्यासपीठ मिळत नाही त्यांच्या आरोग्यापासून सामाजिक, करिअर अशा सर्व प्रश्नांचे निराकरण तज्ज्ञांच्या मार्फत केले जाणार आहे. सुरुवात जरी आम्ही केली असली तरी आपण यात सहभागी होऊन ही चळवळ बनावी, ही अपेक्षा आहे. - कनक वाईकर, संस्थापिका, वूमनविश्व
‘ती’च्यासाठी खुले झाले दालन संवादाचे!
By admin | Updated: September 28, 2016 04:48 IST