राज्य शासनाने कोरोनानंतर योग्य खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. मात्र, पुणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी न झाल्याने, पालिका प्रशासनाने शाळा सुरू करण्यास ४ जानेवारी रोजी परवानगी दिली. शहरातील उशिरा का होईना शाळा सुरू झाल्या असल्या, तरी अद्याप या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढलेली नाही. त्यामुळे पालकांच्या मनातील कोरोनाबाबतची भीती पूर्णपणे गेली नसल्याचे दिसून येत आहे.
पालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रमुख शिवाजी दौंडकर, कोरोनानंतर पालिकेच्या सर्व ४४ माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठविण्यास अनेक पालकांनी हमीपत्र लिहून दिले असले, तरी विद्यार्थी उपस्थिती ३० ते ३५ टक्के आहे. पालिकेच्या शाळांमधील एकूण आठ हजार विद्यार्थ्यांपैकी सध्या ३ हजार २०० विद्यार्थी शाळेत येत आहेत. मात्र, त्यात वाढ व्हावी, यासाठी शिक्षकांकडून पालकांचे प्रबोधन केले जात आहे.