टाकवे बुद्रुक : मावळातील गुलाबाच्या फुलांचा सुंगध परदेशात दरवळणार असून, व्हॅलेंटाइन डेसाठी मावळातून सुमारे दीड कोटी गुलाबपुष्पाची परदेशात निर्यात केली आहे. गुलाबाच्या फुलांची वाढती मागणी आणि योग्य बाजारभावामुळे या वर्षीचा हंगाम तेजीत गेला आहे. जपान, इंग्लंड, फ्रान्स, दुबई, हॉलंड आदी देशांत मावळ तालुक्यातूनच सर्वाधिक गुलाब निर्यात झाला आहे. तालुक्यात सुमारे ३५० ते ४०० हेक्टरवर पॉलीहाऊस आहेत. त्यातील २५०हून अधिक क्षेत्रात गुलाब उत्पादक आहेत. मावळचा शेतकरी जास्त करून व्हॅलेंटाइनसाठी नियोजन करून फूल उत्पादक घेत असतो. शेतकरी त्याअगोदर एक ते दोन महिने तयारी सुरू करतो. डिसेंबर महिन्याच्या कालावधीत गुलाबाची कटिंग केली जाते. त्यानंतर रोगराईवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध प्रकारची खते, ओषधे फवारणी केली जाते. त्यानंतर नियोजनानुसार जानेवारी, फ्रेब्रुवारी महिन्याच्या कालावधीत फुले विक्रीसाठी तयार केली जातात. या वर्षी शेतकऱ्यांनी काळजी घेतली आहे. व्हॅलेंटाइन डेसाठी जास्तीत जास्त मागणी लाल गुलाब फुलांना असते. त्यात बोरडेक्स, टॉप सिक्रेट, सामुराई, अप्पर ग्लास या जातींना विशेष मागणी होती. त्या पाठोपाठ गोडल्टीईक (पिवळा), पॉयझन (पिंक), भावलॉच (पांढरा), ट्रापिकल (नारंगी) या जातींना मागणी असते. आंदरमावळातील पंधरा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंद्रा व्हॅली ग्रुपची स्थापना केली असून मावळ तालुका कृषी उत्पन्न समितीमार्फेत फुलांची विक्री केली जाते. (वार्ताहर)एका एकरातून ४० ते ४५ हजार गुलाबाचे उत्पादन होते. तर स्थानिक बाजारपेठेत गुलाबाला सात रुपये, तर निर्यात केलेल्या प्रत्येक गुलाबाला १३ रुपये भाव मिळतो. म्हणजे शेतकऱ्याला सरासरी ५ ते ६ लाख रुपये उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी परदेशात गुलाबाला कमी मागणी आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.
गुलाबाचा सुगंध सातासमुद्रापार
By admin | Updated: February 14, 2016 03:22 IST