लोकमत न्यूज नेटवर्क
डिंभे : पुणे जिल्ह्यात सध्या भातपेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील भात उत्पादक क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग भातपेरणीच्या कामात गुंतला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सर्वत्र भातशिवार पेरणीसाठी सज्ज झाली असून, सरत्या रोहिणी नक्षत्रावर सध्या सर्वत्र भातपेरणी सुरू झाली आहे. यंदाच्या भात हंगामात पावसाने चांगली साथ दिल्यास भात उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागासह भात उत्पन्नाचे क्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातपेरणीची तयारी करून ठेवली होती. वाफे भातपेरणीसाठी सज्ज होते. रोहिणी नक्षत्र निघताच शेतकऱ्यांचे डोळे अकाशाकडे लागले होते. अनेक तालुक्यांच्या गावांतून भात बियाणे उपलब्ध असणाऱ्या दुकानांतून बियाणे खरेदीसाठी लॉकडाऊन असूनही शेतकरीवर्ग गर्दी करत होते. सध्या पारंपरिक भात बियाणांना फाटा देऊन तयार बियाणे विकत घेण्यासाठी शेतकरी पसंती देत असल्याचे पहावयास मिळते.
दरवर्षी शेतकरी रोहिणी नक्षत्रात पाऊस पडेल या आशेवर धूळवाफेवर भातपिकाची पेरणी करतात. मात्र, यंदा चित्र काहीशे उलटे झाले. रोहिणी नक्षत्र सुरू होताच आलेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. एरवी पेरणीसाठी पावसाची वाट पहावयास लावणाऱ्या पावसाने यंदा भात पेरणीसाठी शेतकऱ्यांना वापसाच दिला नाही. सध्या रोहिणी नक्षत्र शेवटच्या टप्प्यात असून, पुणे जिल्ह्यातील भातउत्पाक क्षेत्रात सर्वत्र भातपेरणीचा हंगाम सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. रोहिणीची वाफ लागल्यामुळे यंदा भातपीक चांगले येणार, असा शेतकऱ्यांमध्ये संकेत असतो. रोहिणी नक्षत्राची वाफ लागल्यास भातरोपे वेळेत उगवून लागवडीसाठीही वेळेत होतात. पुढे पाऊसमान चांगला राहिल्यास भरघोस भातउत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडते. यालाच रोहिणीची वाफ म्हणतात, असा शेतकरी वर्गाचा संकेत आहे.
पेरणीसाठी वाफ्याची सफाई करणे, दुसऱ्या शेतकऱ्याकडे सांगून ठेवलेले बी आणने, शेती औजारे जमा करणे, इत्यादी कामांची धामधूम गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. काही भागात भात पेरणीसाठीचा मुहूर्त पाहण्याची परंपरा आहे. यंदाची भातपेरणी कुणाच्या हस्ते करावयाची याचाही ताळा काढला जातो. त्या व्यक्तीच्याच हस्ते सुरुवातीची मूठ पेरली जाते. शिवारातील देवासमोर पाच मूठ भाताचे दाने ठेवून मगच भातपेरण्या करण्याची अनेक गावांतून प्रथा आहे. ज्या व्यक्तीच्या हस्ते भातपेरणीचा मुहूर्त येतो, त्या व्यक्तीला भात पेरणीसाठी बोलविण्याचीही परंपरा असल्याचे पहावयास मिळते.
--
चौकट
गेल्या काही वर्षांतील पावसाचा अंदाज पाहता धूळवाफेवरील पेरण्या करण्यासाठी शेतकरी धजावत नाहीत. कारण, नंतर पाऊस न झाल्यास मोलामहागाचे आणलेले बियाणे वाया जाण्याची भीती असते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा व पुरंदर हे तालुके भातशेतीचे आगार समजले जातात. या भागात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भातशेती केली जाते. भातशेती हीच या शेतकऱ्यांच्या जीवनाचा मुख्य आधार असल्याने आंबेगाव तालुका - ५७०० हेक्टर, जुन्नर - ९३००, मावळ - ९७००, भोर - ७५००, वेल्हा - ६०००, हवेली - २८००, खेड - ६७००, मुळशी - १५,७०० व पुरंदर-१४०० हेक्टर एवढे क्षेत्र भात पिकाखाली आले आहे.
--
फोटो ०६ डिंभे भात लागवड
ओळी : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात रोहिणी नक्षत्रावर सुरू झालेल्या पेरण्यांचे दृष्य.