कोरेगाव भीमा : एटीएम ग्राहकांना लुटणारी पाच जणांची आंतरराज्यीय टोळी शिक्रापूर पोलिसांनी दोन तासांत जेरबंद केली असून, त्यांच्याकडून एक लाख एक हजार रुपये व कार जप्त केली आहे़ या टोळीच्या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. त्यांनी पुणे, नगर, शिर्डी, नाशिक येथे एटीएम ग्राहकांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे़ मनीष दत्तू सोनवणे (वय २७), सनी विष्णू पळघने (२०, दोघे रा. उल्हासनगर नं. ३, कल्याण वेस्ट), महेश पांडुरंग धनगर (२५, शांतिनगर ब्राह्मणपाडा, कल्याण वेस्ट), गणेश भालचंद्र लोडते (१९, उल्हासनगर, कल्याण वेस्ट), सोनू रामशीस राजभर (२०, हनुमाननगर, उल्हासनगर नं. ३, कल्याण वेस्ट) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़या प्रकरणी बासुदेव सुबल दलई यांनी फिर्यादी दिली आहे़ बुधवारी (दि. १२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बासुदेव दलई हे कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी रांगेत उभे असताना त्यांच्याजवळ टी शर्ट घातलेला २० ते २१ वर्षांचा मुलगा येऊन त्यांना म्हणाला, की ‘नातेवाइकांना पैसे पाठवायचे असून, माझे या बँकेत खाते नसल्याने माझ्याजवळील १ लाख २५ हजार रुपये तुम्ही तुमच्या खात्यात भरा.’ परंतु, त्यांनी त्याला नकार दिला. दरम्यान, बासुदेव यांच्या पुढे रांगेत उभ्या असणाऱ्या इसमाने बासुदेव यांना बाजूला बोलावून घेऊन सांगितले, की ‘तुझ्या खात्यावरून पैसे पाठवून देऊ व त्यामोबदल्यात या मुलाकडून पैसे घेऊ.’ त्या मुलाला त्याने बोलावून पैसे खात्यातून पाठवण्याच्या मोबदल्यात त्यांना १० हजार रुपये देण्याचे ठरले; परंतु याला बासुदेव यांनी नकार दिला. दरम्यान, या ठिकाणी आणखी एक मुलगा बासुदेव यांच्याजवळ येऊन त्यांची समजूत काढू लागल्यानंतर बासुदेव पैसे खात्यातून पाठवण्यास तयार झाले. त्यानंतर मुलाने बासुदेव याच्याकडे रुमालात बांधलेले एक लाख रुपये दिले व बासुदेव याच्याकडील २४ हजार ९०० रुपये रुपये स्वत:कडे घेतले. रांगेत उभा असणारा व नंतर त्या ठिकाणी आलेला मुलगा या दोघांनी बासुदेव यांना एक लाख रुपये दिलेल्या मुलाला सोडवून येतो, असे सांगून ते तिघे एका ग्रे रंगाच्या कारजवळ गेले. हे तिघे व त्या वाहनाजवळ असणारे इतर दोघे गाडीमध्ये बसून जोरात गाडी नगर बाजूकडे निघून गेल्याने बासुदेव यांना संशय आल्याने त्यांच्या दिलेल्या रुमालाची गाठ सोडून पाहिले असता, त्यामध्ये कागदाचा बंडल असल्याचे दिसल्यावर व्हॅगनर गाडीतील ५ जणांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर बासयदेव दलई यांनी रात्री ११ वाजता शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक झाल्याची तक्रार दिली व ५ जणांचे वर्णन सांगितले़ शिक्रापूर पोलिसांनी सर्व मार्गांची नाकेबंदी करून फसवणूक केलेल्या टोळीला पकडण्यास पोलीस पथक रवाना झाले. दरम्यान, फिर्यादी बासुदेव याने दिलेल्या वर्णनाचे तरुण सणसवाडीतील हॉटेल गोल्ड कॅसल या हॉटेलामध्ये दोन दिवसांपासून राहण्यास असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजल्यानंतर पोलीस निरिक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे, सुरेश कांबळे, पोलीस नाईक विलास आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप जगदाळे, अनिल जगताप, विष्णू फटांगडे यांच्या पथकाने गोल्ड कॅसल हॉटेलामधून या ५ आरोपींना दोन तासांत जेरबंद केले असून, त्यांच्याकडील १ लाख १ हजार रुपये व कारही जप्त केली आहे. टोळीला अधिक तपासासाठी दि. १९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शिरूर न्यायालयाने दिले आहे़
एटीएम ग्राहकांना लुटणारी टोळी जेरबंद
By admin | Updated: August 14, 2015 03:20 IST