लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्ह्यात दुपारनंतर मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली, भोर, बारामती, इंदापूर या तालुक्यांतदेखील जोरदार पावसाने हजेरी लावली. चासकमान धरण परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकाचे नुकसान झाले. बारामती शहरातील विविध रस्त्यांवर पाणी साठल्याने दुचाकी वाहनचालकांची त्रेधा उडाली. काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे छोटे-मोठे अपघातही झाल्याचे पाहायला मिळाले. कसबा अण्णाभाऊ साठे चौकालगत राज्यमार्गाचे बेकायदेशीर खोदकाम करून भूमिगत गटाराचे काम केले, मात्र राडारोडा तसाच ठेवल्याने त्यावरून घसरून काही दुचाकीस्वार पडले. खेड तालुक्यात पावसाने आज दमदार हजेरी लावली. चासकमान परिसरात सध्या भुईमुग काढणीची कामे वेगाने सुरु असल्यामुळे भुईमुग पिकाबरोबरच बाजरीचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरांमध्येही पाणी घुसल्यामुळे घरातील अन्न धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इंदापूरमध्ये सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अण्णाभाऊ साठेनगर व त्या लगतच्या वडारगल्ली रामोशीगल्लीमधीलअनेक घरांमध्ये पाणी शिरले. रस्त्यानेही पाण्याचे लोंढे वहात होते. वालचंदनगर परिसरात आज ३ वाजता मुसळधार पावसाने सुरुवात केली. दोन तास झालेल्या पावसामुळे घरांना शेततळ्याचे स्वरूप आले.- तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मॉन्सूनपूर्व पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी ओढ्या-नाल्यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. - दिवसभर ठिकठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावल्याने बळीराजा सुखावल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडीचे चित्र पाहायला मिळाले. पावसामुळे वृद्धाचा मृत्यू : चासकमान परिसरातील ओढे नाले पूरनियंत्रण रेषा ओलांडून वाहत होते. चास येथील राजगुरुनगर-भीमाशंकर महामार्गालगत ओढ्यानजीक खडकावर वसलेल्या माळीवस्तीत घरात पाणी घुसले. घरात झोपलेले वयोवृद्ध तुकाराम पंडू रासकर (वय ९०) यांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला. त्यांच्या घरात दोन फुटांपर्यंत पाणी शिरलेले होते. बंद दरवाजातून घरात पाणी जाऊन साठले गेले. त्यात तुकाराम रासकर यांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मित मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली. आसपासच्या घरातील इतरांचेही मोठे नुकसान झाले.
आला रे मुसळधार मॉन्सून...
By admin | Updated: June 13, 2017 03:57 IST