भवानीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कृती समिती पाठोपाठ राष्ट्रीय समाजपक्षाने शेतकरी संघटनेसह छत्रपती सहकारी साखर कारखान्याची स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत तिहेरी लढत होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवानीमाता पॅनलची रविवारी घोषणा केली आहे. तर शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी देखील स्वबळावर लढणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. त्यानंतर रासप, शेतकरी संघटनेने स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केल्याने कारखान्याची तिहेरी लढत निश्चित झाली आहे.याबाबत रासपचे पश्चिम महाराष्ट्र सचिव संपतराव टकले, जिल्हा उपाध्यक्ष बापूराव सोलनकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली. याबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. विद्यमान संचालक मंडळाने भ्रष्टाचाराचा उच्चांक केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गेल्या सात वर्षात सत्ताधारी गटाने ‘होयबा’ चेअरमन दिले आहेत. पारंपारिक घराण्यांनाच पदे देण्यात सत्ताधारी मशगुल आहेत. कारखाना विस्तारवाढीला सभासदांनी परवानगी दिली असताना शेजारच्या खासगी साखर कारखान्यांचे हीत जोपासण्यासाठी संचालक मंडळ ठरावीक जणांनी चाकरी करीत आहेत. शेजारील कारखान्यांना ऊस देताना ऊस वाहतुकीपोटी २७ कोटी रुपयांचा तोटा ऊस उत्पादकांना सहन करावा लागत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. बैठकीसाठी विष्णू चव्हाण, विजय थिटे, बापूराव सोलनकर, विनित पाटील, गिरीधर ठोंबरे, उमेश सपकळ, प्रकाश देवकाते, किशोर मासाळ, आण्णा पाटील, रमेश पाटील, नवनाथ मलगुंडे, अॅड. दिलीप धायगुडे, अॅड. गिरीष पाटील, रामदास अर्जुन आदी उपस्थित होते.
रासप, शेतकरी संघटना स्वबळावर लढणार
By admin | Updated: March 23, 2015 23:09 IST