ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 13 - गेल्या अनेक वर्षांमध्ये संगीत क्षेत्रात जी साधना केली. त्याची साक्ष देणा-्या दुर्मीळ मैफिली, संगीताचे कार्यक्रम, सादर केलेली गाणी पोलिसांच्या तत्परतेमुळे परत मिळाली. एक प्रकारे अनेक वर्षांची संगीत साधनाच परत मिळाली असल्याची भावना व्यक्त करीत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले. अनेक वर्षांपासून केलेली संगीत साधना, दुर्मिळ आणि गाजलेल्या मैफलीतील गायन, रसिकांना भुरळ घातलेल्या बंदिशी या संगीत साधकाला पैशांपेक्षा मोलाच्या असतात. या आठवणी त्याच्यापासून दूर जातात, तेव्हा विलक्षण दु:ख होते. पण, त्या पुन्हा मिळतात तेव्हा आनंद गगनात मावत नाही,असे सांगताना त्या भावनाविवश झाल्या होत्या.
दोन दिवसांपूर्वी पहाटे चोरांनी अत्रे यांच्या घरातून त्यांचे तीन मोबाइल आणि हार्ड डिस्क चोरल्या होत्या. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्परतेने कारवाई करून चोराला दोन दिवसांत जेरबंद केले. त्याच्याकडून अत्रे यांचे मोबाइल आणि हार्ड डिस्क जप्त करून त्यांनी मंगळवारी अत्रे यांच्या घरी जाऊन सर्व मुद्देमाल परत केला. पैशांपेक्षा अनमोल असलेला ठेवा पोलिसांनी परत केल्याने अत्रे यांनी पोलिसांच्या पथकाचे आभार मानले. अत्रे म्हणाल्या, मी ज्या जुन्या मैफिलींमध्ये गायले त्यातील अनेक दुर्मिळ अशा बंदिशी हार्ड डिस्कमध्ये होत्या. सध्या एका पुस्तकावर काम करीत आहे. त्यातील मजकूर; शिवाय नव्याने सुरू करीत असलेल्या काही
प्रोजेक्ट्सची माहितीही त्यात होती. माझ्यासाठी तो अत्यंत अनमोल असा ठेवा आहे. अनेक आठवणी त्यात साठवलेल्या आहेत. हार्ड डिस्क चोरीला गेल्याने अस्वस्थ व्हायला झाले होते. परंतु, त्या सगळ्या आठवणी पुन्हा परत मिळाल्याने अत्यंत आनंद होत आहे. पोलिसांनी अशा प्रकारे पुणेकरांच्या तक्रारींबाबतीत तत्परता दाखवून त्यांच्या प्रकरणांचा छडा लवकरात लवकर लावावा, अशी अपेक्षाही अत्रे यांनी या वेळी व्यक्त केली.