पुणे : बिहारमधील खंडणीसाठी अपहरण केल्या जात असलेल्या घटनांवर आधारित अजय देवगण याचा ‘अपहरण’ या चित्रपट काही दिवसांपूर्वी येऊन गेला होता़ बिहार, उत्तर प्रदेशामध्ये घडणार्या अशा घटनांचे लोण काही वर्षांपूर्वी पुण्या-मुंबईत मोठ्या प्रमाणावर होत होत्या़ त्यात प्रामुख्याने परप्रांतीयांचा समावेश असल्याचे दिसून येत होते़ मागील दोन तीन वर्षांमध्ये खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्याच्या गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत होते़ दलाराम राठोड यांच्या खुनानंतर पुन्हा अशा घटनांनी उचल खाल्ली असल्याचे दिसून येत आहे़ पूर्वी अशा गुन्ह्यांमध्ये एक तर परप्रांतीय गुन्हेगार असत किंवा संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग असे़ पण आता स्थानिक गुन्हेगारांच्या टोळ्या पैसे मिळविण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे पुढे आले आहे़ दलाराम राठोड यांचे अपहरण करण्यामध्ये कोंढव्यातील स्थानिक गुन्हेगारांचा हात असल्याचे पुढे आले आहे़ गेल्या वर्षी एप्रिल २०१३ मध्ये मुंबईतील प्लॉट व बंगला आपल्यालाच विकावा यासाठी विनोद ब्रोकर आणि उषा नायर या ज्येष्ठ नागरिकांचे पुण्यातून अपहरण करुन त्यांचा खून करण्यात आला होता़ पुरावा नष्ट करण्यासाठी सातारा येथील एका गावाबाहेर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता़ पोलिसांनी नितीन भाटिया, इब्राहिम श्ेख, रवींद्र रेड्डी व त्यांच्या साथीदारांना याप्रकरणात अटक केली होती़ दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये पाषाण येथील एआरडीई येथे राहणार्या रावळ यांचा पाच वर्षांचा मुलगा शुभ यांचे अपहरण करुन त्याचा खून करण्यात आला होता़ त्यांच्या ओळखीचा असलेल्या परमिंदर सिंग या तरुणाने हा प्रकार केल्याचे तपासात उघड झाले होते़ त्याच्या अगोदर एप्रिल २०१२ मध्ये दिघी येथील शुभम शिर्के याचे त्याच्याच शाळकरी मित्रांनी अपहरण करुन खून केला होता़ त्याच्या वडिलांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती़ यातील दोन मुले अल्पवयीन होते़ टीव्हीवरील सीआयडी मालिका पाहून त्यांना ही कल्पना सुचल्याचे पकडल्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितले होते़ पुण्यातील सर्वाधिक गाजलेल्या खटल्यामध्ये निगडीतील सागर सहानी प्रकरणाचा समावेश होतो़ १४ आॅगस्ट २००५ मध्ये पिंपरीतून सागर सहानी याचे काही जणांनी अपहरण केले होते़ त्यांना १५ लाख रुपयांची खंडणी दिल्यानंतरही तो आपल्याला ओळखेल म्हणून नाशिक -वापी रोडवर त्याचा खून करुन मृतदेह टाकून दिला होता़ या प्रकरणातील प्रमुख आरोपी नितीन मोढा हा सौदी अरेबियात पळून गेला होता़ या प्रकरणात सॅटेलाईट फोन, हवाला मार्फत पैसे परदेशात पाठविण्यात आले होते़ विशेष म्हणजे या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र पोलीस, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश यांच्यासह अनेक राज्यातील पोलिसांचा सहभाग होता़ परराष्ट्र खात्याच्या माध्यमातून सौदी अरेबियातून नितीन मोढा याला भारतात पुन्हा परत आणण्यात पोलिसांना यश आले होते़ या खटल्यात प्रसाद शेट्टी, अरविंद चौधरी, भिकू थांकी, जितेंद्र मोढा, छोटू घैसाईवाला आणि नितीन मोढा यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे़(प्रतिनिधी)
खंडणीसाठी अपहरणाच्या गुन्ह्यांनी पुन्हा खाल्ली उचल
By admin | Updated: May 30, 2014 04:56 IST