आळंदी देवाची : देवाच्या आळंदीत देहूफाटा (ता. हवेली) परिसरातील विनापरवाना लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असून, विश्रांतवाडी (पुणे शहर पोलिसांनी) देहूफाटा ते इंद्रायणी नदीकिनारी असणाऱ्या लॉजवर छापा टाकून त्वरित कारवाई करण्याची मागणी परिसरातील महिलांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देहूफाटा, वाय जंक्श्न चौकात अनेक लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असून, याबाबत अनेक वेळा मार्चे, विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, महिलांनी रास्ता रोको करून आंदोलने केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पुणे श्हर पोलीस आयुक्त, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन यांच्याकडे या विनापरवाना चालणाऱ्या वेश्याव्यवसायाविषयी तक्रार अर्ज, निवेदने दिली. परंतु, सर्व निवेदनांना अक्षरश: केराची टोपली दाखविण्यात आली. या परिसरात कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुली, परिसरात राहणाऱ्या महिला यांना रस्त्याने पायी जाता-येताना दररोज गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाहीत. एकीकडे महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन सर्व पक्षीय नेतेमंडळी भाषणात सांगतात. परंतु, या तीर्थक्षेत्र आळंदीत महिलांना, मुलींना अक्षरश: जीव मुठीत धरून घराबाहेर पडावे लागते. देहूफाटा परिसरात गुंडप्रवृत्तीचे लोक महिलांची छेडछाड करतात. काही लोक अश्लील भाषेत बोलतात. त्यांचा त्रासह आजूबाजूच्या लोकांना होतो. माऊलींच्या दर्शनासाठी आलेले भाविक या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत. देहूफाटा, वाय जंक्शन परिसरात प्रत्येक लॉजच्या इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई केलेली असून, वाहने उभी करण्यासाठी अंडरग्राऊंड मध्ये पार्किंगची व्यवस्था आहे. या परिसरातील लॉजमध्ये अनेक जोडप्यांनी आत्महत्या केल्या आहेत. युवक व महिलांचे खून झाले आहेत. तर, काही जणांचे या अश्लील प्रकरणामुळे निष्पाप बळी गेलेले आहेत. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)
राजरोस वेश्याव्यवसाय
By admin | Updated: July 18, 2014 03:38 IST