काऱ्हाटी : पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, जिवापाड सांभाळलेली जनावरे कशी वाचवायची, या विचाराने शेतकरी चिंतेत पडला आहे. पावसाळ्यातच ‘जनाई शिरसाई’ योजनेतून बंधारे, पाझर तलाव भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील काऱ्हाटी, माळवाडी, फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार आदी गावांत खरीप हंगामात केलेली पेरणी वाया गेली. पेरणीचा खर्च, बी-बियाणे, खते, दिवसरात्र केलेली मेहनत वाया गेली आहे. जनावरांसाठी चारापिके घेता आली नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चांगले पाणी नसल्यामुळे क्षारयुक्त पाणी जनावरांना पाजावे लागत आहे. परिणामी दूध उत्पादनात घट झाली आहे. खरीप हंगाम वाया गेल्यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सततची पाणीटंचाई व दुष्काळ या भागातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजली असल्याची खंत काऱ्हाटी येथील शेतकरी मधुकर जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. निरवांगी : निमसाखर (ता. इंदापूर) येथील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना ३ ते ४ किलोमीटर अंतरावरून बेंद्रेवस्ती येथील हातपंपावर जावे लागत आहे. शाळेतील मुलांना पोषण आहार शिजवण्यासाठी पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. इंदापूरचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी या गावातील पिण्याच्या पाण्याची त्वरित पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.निमसाखर गावची लोकसंख्या जवळपास ८ हजारापर्यंत आहे. या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर दगडवाडी येथे आहे. या विहिरीतील पाणी क्षारयुक्त आहे. हे पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत नाहीत. या विहिरीतील पाण्याची पातळी अंत्यत कमी झाली आहे. हे पाणी आठ दिवसांतून फक्त एक तास येत आहे. त्यानंतर मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जे मिळेल पाणी तेच पाणी प्यावे लागत आहे.
पावसाची ओढ; शेतकरी हवालदिल
By admin | Updated: August 10, 2015 02:55 IST