पुणे : महापालिकेने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या लाडकी लेक योजनेस पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत या योजनेसाठी तब्बल पाचशे पुणेकरांनी अर्ज केले असून, चारशे मुलींच्या नावे महापालिकेकडून राष्ट्रीयीकृत बँकेत प्रत्येकी ३० हजार रुपयांची ठेव १८ वर्षांसाठी ठेवण्यात आली आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखून मुलींच्या जन्माचे स्वागत केले जावे, यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका प्रशासनाने मुलगी दत्तक योजना (लाडकी लेक) सुरू केली आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी त्यांच्या अंदाजपत्रकात ही योजना मांडली होती. प्रशासनाने २०१४-१५ या वर्षात या योजनेला सुरुवात केली. त्यात पहिल्याच वर्षी तब्बल ४६८ अर्ज आले होते. त्यामधील ३५० अर्जांची प्रत्येकी ३० हजार रुपयांप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकेत गुंतवणूक करण्यात आली आहे. तर उर्वरित ११८ पैकी ४७ पालकांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्याची तयारी दर्शविल्याने त्यांच्या गुंतवणुकीची तयारी पालिकेकडून सुरू असल्याचे नागरवस्ती विभागाचे प्रमुख डॉ. हनुमंत नाझीरकर यांनी सांगितले. त्याचबरोबर २०१५-१६ या चालू वर्षासाठी आत्तापर्यंत ६७ अर्ज आले असून, त्यांच्या गुंतवणुकीची कार्यवाही सुरू असल्याचे नाझीरकर यांनी सांगितले.या योजनेसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद केली जात असून, या निधीतून महापालिका प्रत्येक मुलीच्या मागे २० हजार रुपयांचा निधी ठेव म्हणून ठेवण्यात येतो. या वर्षी पहिल्या तीन महिन्यांत ६७ अर्ज आले असून, वर्षाअखेरीस ही संख्या सुमारे ४०० पर्यंत जाण्याची शक्यताही प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)अशी आहे योजना...या योजनेनुसार महापालिका हद्दीत जन्मास आलेल्या एक वर्षाच्या आतील मुलीच्या नावाने महापालिकेकडून बँकेत २० हजार व पालकाकडून १० हजार अशी ३० हजारांची रक्कम मुलीच्या नावाने राष्ट्रयीकृत बँकेत दामदुप्पट योजनेत गुंतविण्यात येत आहे. संबंधित मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ही ठेव या मुलीस मिळेल. मात्र, या योजनेसाठी काही अटी घालण्यात आल्या असून त्यामध्ये पालिका हद्दीत राहणाऱ्या व ज्यांचे उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांना या योजनेत सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी संबंधित व्यक्तीला एक किंवा दोन मुली असणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली आहे.
‘लाडक्या लेकी’साठी पुणेकर सरसावले
By admin | Updated: August 12, 2015 04:35 IST