लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपाला सत्ता कशी राबवायची याची माहितीच नाही. त्यामुळेच त्यांनी सत्तेवर आल्यानंतर फक्त दोनच महिन्यांत २४ तास पाणी योजनेसाठी महापालिकेला कर्जबाजारी केले आहे, अशी टीका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी केली. पुणेकर त्यांना याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.कर्जरोख्यांच्या प्रस्तावाच्या विरोधात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना चांदेरे म्हणाले, ‘‘पुणे महापालिकेकडे देशात आदर्श म्हणून पाहिले जाते. तो लौकिक भाजपाने घालवला. आता कर्जबाजारी महापालिका म्हणून पाहिले जाईल. वास्तविक असे करण्याची काही गरज नाही. २ हजार २६४ रुपये कर्ज एकदम काढले जाणार नाही. त्याचे २०० कोटी, ४०० कोटी असे टप्पे आहेत. अंदाजपत्रकात यंदाच पाणी योजनेसाठी तब्बल ७५० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षी ती ५०० कोटी रूपये होते. इतके पैसे आहेत तर मग कर्ज काढण्याचे कारण काय? हा त्यांचा कोणाला तरी खूश करण्याचा उपाय दिसतो आहे अशी शंका घेतली तर गैर आहे असे म्हणता येणार नाही.’’ योजनेचे सगळे कामच शंकास्पद आहे, असा आरोप करून चांदेरे म्हणाले, महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे म्हणून कर्ज काढायचे हा तर्क तर समजतच नाही. यापूर्वीच्या केंद्र व राज्य सरकारांनी महापालिकेला अनेक योजनांसाठी मदत केली आहे. त्यात महापालिकेचा हिस्सा असायचा. या वेळी तर सगळीकडे त्यांचीच सत्ता आहे; मात्र त्यांना काही करता येत नाही. एकाच योजनेसाठी ५ वर्षांत का होईना; पण तब्बल ३ हजार ३०० कोटी रूपये खर्च करणेच मुळात चूक आहे. पुन्हा योजना पूर्ण होईल याची खात्री नाही. आयुक्तांची बदली झाल्यानंतर भाजपाचे पदाधिकारी त्यांना जाब विचारायला त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाणार आहेत का?’’
पुणेकर विचारतील भाजपाला जाब
By admin | Updated: June 12, 2017 01:46 IST