पुणे : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना सध्या बोर्डाकडून कोणतीही आर्थिक मदत करण्यात येत नाही. त्यामुळे याबाबतची नियमावली बनवून दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर बोर्डातील नागरिकांनाही आर्थिक मदत मिळू शकणार आहे.३ आॅगस्ट रोजी कुंभार बावडी येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये ३ कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बोर्डाने दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना मदत करण्यासाठी नियमावली बनविली नसल्याने या कुटुंबीयांना बोर्ड मदत करू शकणार नाही. मात्र, भविष्यात अन्य कुटुंबीयांना मदत मिळण्यासाठी भाजपचे सदस्य अतुल गायकवाड यांनी याबाबतचा ठराव दिला आहे. त्यानुसार या महिन्याच्या सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णय होणार आहे.कॅन्टोन्मेंट कायदा २००६ मधील तरतुदीनुसार कोणतेही कॅन्टोन्मेंट बोर्ड हे दुर्घटनाग्रस्तांना मदत करू शकते. मात्र, त्यासाठी संबंधित बोर्डोने नियमावली करणे आवश्यक असते. ही नियमावली तयार करण्याबाबत सदस्य अतुल गायकवाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीवकुमार यांना पत्र दिले आहे. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे.कुंभार बावडीत दुर्घटना झालेली कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असून त्यांना बोर्डाने मदत करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सद्स्यपदाचे या महिन्याचे मानधन या कुटुंबीयांना देणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.
कँन्टोन्मेंट बोर्डात दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याचा प्रस्ताव
By admin | Updated: August 19, 2015 00:14 IST