पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी इच्छुकांसह कार्यकर्त्यांची पळापळ सुरु आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यासाठी वेळ अपुरा पडत असल्याने इच्छुकांसह कार्यकर्त्यांचा सोशल मिडियावर प्रचार सुरु आहे. काही राजकीय पक्षाकडून उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. निवडणुकीला अवघा १७ दिवसांचा कालावधी शिल्लक असून हा वेळ प्रचारासाठी अपुरा आहे. त्यामुळे इच्छुकांनी उमेदवारी यादी जाहीर होण्याची वाट न पाहता प्रचार सुरु केला आहे. यामध्ये सोशल मिडियाद्वारे प्रचार करण्यावर अधिक भर दिला आहे. सध्या तरुणांकडून व्हॉट्सअॅप व फेसबुकचा अधिक वापर होत आहे. याचाच फायदा उमेदवार घेत असून सोशल मिडियावरुन प्रचार करण्यास प्राधान्य देत आहेत. फेसबुकवर आपल्या उमेदवाराचे छायाचित्र लोड करुन मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. इच्छुक उमेदवाराने केलेल्या कामाची माहिती, वैयक्तिक माहिती तसेच त्यांचा अजेंडा फेसबुकवर अपलोड केला जात आहे. कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअॅपवर गु्रप बनविले आहेत. सभा कोठे आहे, पदयात्रा कोठे असेल, दैनंदिन कार्यक्रम अशी सविस्तर माहिती व्हॉट्सअॅपवर तातडीने मिळत आहे. सोशल मिडियामुळे मतदारांपर्यंत पोहचणे काहीसे सोयीचे झाले आहे. सण, उत्सवांचे निमित्त साधून इच्छुक मतदारांना शुभेच्या पाठवित आहेत. (प्रतिनिधी)
सोशल मीडियावरुन प्रचाराला जोर
By admin | Updated: September 27, 2014 07:31 IST