पुणे : आघाडीतील बिघाडी आणि युतीतील ताटातूट यामुळे विद्यमान आमदार असलेल्या उमेदवारांसह शिवसेना, भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या इच्छुकांना आपली प्रचारपत्रके दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांची छायाचित्रे व महायुती व आघाडीचे उल्लेख काढून टाकून नव्याने ती तयार करून घ्यावी लागणार आहेत.उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी बहुसंख्य इच्छुकांनी आपापली प्रचारपत्रके किंंवा कार्यसिद्धी अहवाल तयार केले आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या, तर भाजपच्या उमेदवारांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमा छापल्या आहेत. काही जणांनी महायुती होण्याच्या खात्रीने राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्याही प्रतिमा झळकाविल्या आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांनी शरद पवार, अजित पवार यांच्या, तर राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांनी सोनिया गांधी, पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमा पत्रकांवर छापून घेतल्या आहेत. निवडणुकीत प्रचाराची पूर्वतयारी म्हणून अनेकांनी पत्रके छापून घेण्याची तयारी सुरू केली होती. काहींनी छापलीसुद्धा! तथापि, आघाडी व युती तुटल्याने नव्याने प्रचारपत्रके तयार करण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)
ब्रेक-अपचा फायदा पोस्टरवाल्यांना
By admin | Updated: September 26, 2014 05:29 IST