पुणे : चालकांची बेदरकारी आणि खिळखिळ्या झालेल्या पीएमपी बसेसच्या चाकांखाली येऊन - दर वर्षी एकवीसपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये होत आहे. पीएमपीएमएलची उदासीनता आणि चालकांची बेशिस्त यामुळे निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. साधू वासवानी चौकामध्ये शनिवारी सकाळी झालेल्या अपघातामुळे पीएमपी बसमुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल १६ जणांचा पीएमपीच्या अपघातात मृत्यू झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या अनेक बसेस नादुरुस्त आहेत. जुन्या झालेल्या नादुरुस्त बसेस तशाच रस्त्यावर दामटवल्या जाताहेत. त्यामुळे या बसेस म्हणजे चालत्या-फिरत्या ‘किलिंग मशिन्स’ झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. अनेक बसेसना काचा नाहीत, तर काही बसमधून सतत आॅईल गळती होत असते. बसचे ब्रेक सतत गळणाऱ्या आॅईलमुळेही निकामी होण्याचे प्रकार घडतात. शनिवारी तर हडपसर परिसरात एका पीएमपी बसच्या इंजिनमध्ये आग लागली होती. यामध्ये चालक जखमी झाला आहे, तर गुरुवारी सातारा रस्त्यावर झालेल्या पीएमपीच्या अपघातात चालकाच्या बेदरकारीमुळे एका प्रवाशाला प्राण गमवावे लागले. गतिरोधक चुकविण्याच्या प्रयत्नांत वेडीवाकडी बस चालवित वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे दरवाजात उभा असलेला प्रवासी खाली पडला. त्याच्या अंगावरून ज्या बसमधून तो प्रवास करीत होता, त्याच बसचे चाक गेले. शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात, तर बसथांब्यावर उभ्या असलेल्या प्रवासी महिलांच्या अंगावरच चालकाने थेट बस घातली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य दोन महिला जखमी झाल्या. पुण्यातल्या रस्त्यांवर पीएमपी बस पाहिली, की पादचारी, वाहनचालकांच्या मनामध्ये धडकीच भरते. या बसचे चालक कधी आणि कुठल्या बाजूला अचानक बस वळवतील, याचा नेम नाही. बसथांबा आला की, अचानक डाव्या बाजूला बस घेतली जाते. त्यामुळे बसच्या शेजारून जाणारे वाहनचालक एका बाजूला दाबले जातात. त्यामुळे गंभीर अपघातांचा धोका संभवतो. गर्दीच्या ठिकाणीही या चालकांची बेदरकारी पाहायला मिळते. त्यामुळे रस्त्यांवरून वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच पीएमपीजवळून जावे लागते. गेल्या दोन वर्षांत पीएमपीच्या चाकांखाली येऊन शहरामध्ये चाळीसपेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. यातील ४ जणांचा तर चालकाच्या चुकीमुळे बसमधून खाली पडून मृत्यू झालेला आहे. निष्पाप नागरिकांच्या जिवावर उठलेल्या पीएमपीमध्ये सुधारणा आणि चालकांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)
पीएमपी घेते दर वर्षाला २१ जणांचा बळी
By admin | Updated: August 4, 2014 04:28 IST