पुणे : “कोरोनामुळे इच्छा नसतानाही अनेक गोष्टी कराव्या लागतात. राज्य सरकारचे दोन दिवसांचे अधिवेशन हा त्याचाच भाग आहे. केंद्र सरकार संसदेत हेच करते आहे. तरीही देवेंद्र फडणवीसांना एखादा गौप्यस्फोट वगैरे करायचा असेल तर त्यासाठी त्यांना भरपूर जागा आहेत,” असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खिल्ली उडवली.
राज्य सरकारने अधिवेेशनाचा कालावधी कमी केल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. या संदर्भात पवार शुक्रवारी (दि.२५) पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनावर टीका करताना पवार म्हणाले की, मोदी सांगतात गर्दीपासून दूर रहा आणि इकडे त्यांचे राज्यातील भक्त मात्र तोच मार्ग अवलंबतात. “राजकीय पक्षाने एखाद्या घटनेच्या अनुषंगाने कोणाची चौकशी करावी असा ठराव करावा हे नवेच आहे, पण चंद्रकांत पाटील यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्यावर काय बोलणार,” अशी उपरोधिक टीका त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही केली.
“टाटा हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण असतात. त्यांच्या नातेवाईकांचे राहण्याचे हाल होतात असे डॉक्टरांनीच सांगितले होते. त्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी काही व्यवस्था केली. पण त्याला स्थानिकांनी हरकत घेतल्याने मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. हा प्रश्न योग्य मार्गाने सुटला आहे,” असे पवार यांंनी सांगितले. प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांची संघटना वाढवायचा अधिकार आहे, काँग्रेसलाही तो आहेच. ते तसे करत असतील तर गैर नसल्याचे ते म्हणाले.