- लक्ष्मण शेरकर, ओझरसख्ख्या बहिणींप्रमाणे एकत्र राहिलेल्या दोन जावा... पतींच्या निधनानंतर तब्बल ३५ वर्षे त्यांनी हिंमतीने प्रपंचाचा गाडा ओढला. पैकी एक शतकाच्या उंबरठ्यावर, तर दुसरीचे वय ९५... आयुष्याच्या या टप्प्यावरही त्यांनी तब्बल ४० लाख रुपये किमतीची एक एकर जमीन गणेश मंदिराला चक्क दान केली. या आज्यांनी दातृत्वाचा आदर्श उभा केला व सुदैवाने तिसऱ्या पिढीने त्यांच्या या निर्णयाला समंजस साथ दिली. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या शीव वस्तीतील ही घटना. मकाबाई उमाजी बटवाल व बबीबाई चिमाजी बटवाल या दोन जावा. एकीची कूस उजवली, तर दुसरीला अपत्य नाही. बबीबाईचा मुलगा दत्तात्रय व नातू विशाल आणि विक्रम यांच्यावर दोघींनी समाजऋणाचे संस्कार रुजवले. सारे आयुष्य गावातच गेल्याने गावातल्या मातीशी त्यांची नाळ पक्की जुळलेली. याच गावात उदापूर, नेतवड व डिंगोरे गावांच्या शिवेवर स्वयंभू गणेशमूर्ती असलेले एक मंदिर आहे. या मंदिरातील मूर्ती सुमारे ४०० ते ५०० वर्षांपूर्वीची आहे, असे वयोवृद्ध सांगतात. दर वर्षी गणेशजयंतीला अष्टविनायकांतील मुख्य स्थान ओझर येथील ‘श्रीं’चे पुजारी या मूर्तीची विधिवत पूजा करतात. या मंदिराला आख्यायिका आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार दानशूर पांडुरंग बनकर व ग्रामस्थांनी केला. मंदिर परिसर विकासासाठी जागा नसल्याचे पाहून या आज्यांनी उमाजी व चिमाजी या आपल्या पतींच्या स्मरणार्थ ४० लाख रुपये किमतीची एक एकर जागा दान स्वरूपात दिली.वृद्धावस्थेतील या निर्णयाला मुलासह नातवंडांनी आनंदाने संमती देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. ग्रामस्थांनी नातू विक्रम याचाही जाहीर सत्कार केला. कौटुंबिक नात्याच्या बंधनापेक्षा पैशाला महत्त्व देणाऱ्या आजच्या समाजव्यवस्थेत आपल्या कुटुंबांनी आपला शब्द तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल्यामुळे आपल्या आयुष्याचे सार्थक झाले असल्याची भावना या आज्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
शंभरीच्या उंबरठ्यावरही दाखवला दातृत्वाचा आदर्श !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2016 03:17 IST