पुणे : चीन ते दक्षिण आफ्रिका असा लांब पल्ला पार करून अमूर फाल्कन हे पक्षी लोणावळ्यात आले आणि त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी फोटोग्राफरची गर्दीच गर्दी झाली. त्यामुळे या पक्ष्यांना त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली. म्हणून आता वन विभागाने या पक्ष्यांच्या अधिवासाच्या परिसरात फोटोग्राफर यांना येण्यास बंदी घातली आहे. तसा फलकही तिथे लावला आहे.
अमूर फाल्कनला पाहण्यासाठी पाहण्यासाठीच अतिउत्साही नागरिकांची गर्दी झाल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आणि सर्वत्र हीच चर्चा सुरू झाली. नर, मादी आणि त्यांचे पिल्लू असे कुटुंब गवतावर विसावले आहे. काहीशी विश्रांती घेऊन हा पक्षी दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने पुन्हा जातील. पण तोपर्यंत त्यांना पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी होऊ लागली.
सध्या फोटोग्राफी किंवा पक्षी निरीक्षण करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही एक चांगली गोष्ट असली, तरी त्यामुळे पक्ष्यांना किंवा पर्यावरणाला धोका पोहचू नये, याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. जर पर्यटक बेजबाबदारपणे वागले तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवलेच पाहिजे. याच हेतूने वन विभागाने त्वरीत कार्यवाही करत लोणावळा परिसरात संबंधित पक्ष्यांच्या अधिवासाच्या ठिकाणी फोटोग्राफीला बंदी घातली आहे. तसा फलकही लावला आहे. जेणेकरून पक्ष्यांना कोणताही त्रास होणार नाही.
शेकडो मैल प्रवास करून लोणावळा वनक्षेत्रात विसाव्यास थांबलेल्या अमूर फाल्कन पक्ष्याच्या छायाचित्रणावर वन विभागाने बंदी घातली आहे.छायाचित्रकारांना छायाचित्र काढणे महत्वाचे आहे त्यापेक्षा अधिक महत्वाचे त्यांचे संवर्धन करणे आहे.ह्या पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हा निर्णय घेतला.
- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग