लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सात वर्षांपूर्वी सुरू केलेला आॅनलाइन मालमत्ताकर भरणा वाढला आहे. घरबसल्या एका क्लिकवर कर भरणाऱ्यांच्या संख्येत दर वर्षी दुपटीने वाढ होत आहे. अवघ्या ६७ दिवसांत तब्बल ४५ हजार २४७ नागरिकांनी आॅनलाइन कर भरणा केला असून, त्यामध्ये आयटी नोकरदारांची संख्या लक्षणीय आहे. पिंपरी-चिंचवडनगरीची लोकसंख्या सुमारे २० लाखांवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पुनरुत्थान अभियानांतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल शहराची ओळख बनली आहेत. येथील पायाभूत सोयी-सुविधा, महापालिकेने उभारलेल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे हा परिसर मालमत्ताधारकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. त्यामुळे दर वर्षाला शेकडो मालमत्तांची भर पडत आहे. पयार्याने महापालिकेचा मालमत्ताकर भरणा वाढला आहे. नागरिकांना करभरणा सहज करता यावा यासाठी महापालिकेची शहरात १५ करआकारणी व करसंकलन विभागीय कार्यालये आहेत. आगाऊ कर भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना महापालिका करामध्ये दहा टक्के सवलत देते. त्यामुळे आगाऊ कर भरणा करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. याशिवाय महापालिकेने २००९-१० मध्ये आॅनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर प्रत्येक वर्षी आॅनलाइन कर भरणाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ होत आहे. २०१०-११ मध्ये आॅनलाइन कर भरणा सुविधेद्वारे सुमारे २४ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. २५ हजार ६६७ नागरिकांनी आॅनलाइन कराचा भरणा केला.
‘आॅनलाइन’ भरणा वाढला!
By admin | Updated: June 12, 2017 01:39 IST