लोकमत न्यूज नेटवर्क
पाटस : येथील तामखाडा परिसरातील दोन युवकांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवार (दि. ४) रात्री १० च्या सुमारास भानोबा मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी चार आरोपींना १२ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे.
शिवम शीतकल (वय २३), गणेश माकर (वय २३, दोघे रा. अंबिकानगर, पाटस) असे खून झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर महेश ऊर्फ मन्या संजय भागवत (वय २२), महेश टुले (वय २०, दोघेही रा. पाटस, तामखाडा), युवराज शिंदे (१९, रा. गिरीम, ता. दौंड), गहिनीनाथ माने (वय १९, रा. गिरीम, ता. दौंड) यांना अटक केली आहे. तर यांच्यासह पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना मोठ्या शिताफीने पोलिसांनी बारामती विमानतळाजवळ अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश ऊर्फ मन्या संजय भागवत याने शिवम शीतकल याला मोबाईलवर विनाकारण शिव्या दिल्या. याचा जाब विचारायला शिवम आणि गणेश गेले असता आरोपींनी त्यांना काठ्या, तलवार आणि डोक्यात दगड घालून हत्या केली. याबाबत अर्जुन संभाजी माखर (वय १९, रा. पाटस) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पंचनामा केला आहे.