दीपक जाधव, पुणेपासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करताना सध्याचा राहता पत्ता न देता फक्त गावाकडचा पत्ता देणे, गुन्हा दाखल असल्यास त्याची माहिती न देणे, पूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केलेला असतानाही त्याची माहिती न भरणे अशा विविध प्रकारे माहिती लपविणे अर्जदारांना चांगलेच महागात पडत आहे. माहिती लपविणाऱ्या अर्जदारांकडून दररोज सरासरी ७० हजार ते एक लाखापर्यंतचा दंड वसूल केला जात आहे.पुणे पासपोर्ट विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर या ६ जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे विभागाकडे पासपोर्टसाठी दररोज आॅनलाइन दीड हजार अर्ज येतात. अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्याचे आढळून आल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने दंडात्मक कारावाईचा बडगा उचलण्यास सुरूवात केलेली आहे. मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयामध्ये अनेक प्रकारच्या चाळण्या लावून अर्जात भरलेली माहिती तपासून पाहिली जाते. त्यामुळे चुकीची माहिती भरल्याचे किंवा माहिती लपविल्याचे लगेच स्पष्ट होत आहे. माहिती लपविणाऱ्या या अर्जदारांना ५ हजार रुपये दंड आकारला जातो. पासपोर्ट हा नागरिकत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा पुरावा असल्याने अर्जदारांकडून पासपोर्ट कार्यालयाची दिशाभूल होऊ नये म्हणून ही कठोर कारवाई करण्यात येत आहे.
पासपोर्टची माहिती लपविणे महागात
By admin | Updated: August 19, 2015 00:09 IST