सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील बागायती भागाचे क्षेत्र भरमसाट पाण्यामुळे नापीक होत आहे. तर, उर्वरित बारामती दुष्काळाच्या छायेत आहे. एकाच तालुक्यात ३० टक्के भागात सुकाळ, तर ७० टक्के भागात दुष्काळ असल्याचे परस्परविरोधी चित्र दिसते. ७० टक्के भाग ओलिताखाली आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. बारामती तालुक्यातील जिरायती भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर आहेच. तर, दिवाळीनंतरच या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनतो. सुपेचे तळे काही दिवसापूर्वी भरण्यात आले होते. यामध्ये सध्या ३० ते ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर, वाकीचे धरण गेल्या पाच वर्षांपासूनच भरलेच नाही. याव्यतिरिक्त आता मोढवेचे पुरंदरे तळे, उंबर ओढ्याची ३ तळी, सोमेश्वर मंदिर तळे, मुर्टीचे २ बंधारे, मोरगाव येथील कऱ्हा नदीवरील बंधारा, मोराळेचा बंधारा, करंजेचे वाघजाई तळे, बंधारा, येळेवस्ती तळे, पांडुळे तळे ही सर्व तळी व बंधारे कोरडे ठणठणीत आहेत. गेल्या वर्षी सोमेश्वर मंदिर येथील सोमायाचे तळे पहिल्या पावसातच भरले; मात्र तळे पूर्ण गाळाने भरल्याने पावसाचे सगळे पाणी वाहून गेले. बारामतीच्या जिरायती भागाला ‘जनाई-शिरसाई’चे गाजर दाखविले. जनाई-शिरसाई ही योजना तातपुरती मलमट्टी असल्याचे स्थानिक लोकांच्या लक्षात आल्यानंतर या भागातील जनतेने पाण्यासाठी संघर्ष पुकारला. त्यांचा हा संघर्ष आजही चालू आहे.
एकीकडे मुबलक पाणी; अर्धा तालुका दुष्काळी
By admin | Updated: April 7, 2016 00:45 IST