पुणे : पालिकेतील अधिकारी व सेवकांच्या बदल्यांचे धोरण मुख्य सभेत ठराव करून निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार, बदल्या होत नसल्याने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनीही तातडीने बदलींचे आदेश दिले आहेत. परंतु, त्यानंतरही गेली अनेक वर्षे एकाच विभागात ठिय्या मांडून असलेल्या अधिकारी व सेवक यांच्या बदल्या केवळ कागदोपत्री दाखविल्या जात आहेत. त्यामुळे मुख्य सभा व आयुक्तांच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला असून, बदली आणि बढती झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने रुजू होण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभाग, पाणीपुरवठा व मलनि:सारण, भूमी व जिंदगी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गेल्या वर्षी देऊनही अद्याप हे कर्मचारी बदलीच्या विभागात रुजू झालेले नाहीत. या बदल्यांच्या संदर्भात मुख्य सर्वसाधारण सभेत धोरणनिश्चती करण्यात आली होती. परंतु, या आदेशाला हरताळ फासण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे. (प्रतिनिधी)
अधिकारी, सेवकांच्या बदल्या कागदोपत्री!
By admin | Updated: January 23, 2015 23:58 IST