पिंपरी : विठ्ठल-रुक्मिणी प्रसारक दिंडी. मूळची कटफळ सांगरूमची. दिंडीचा मुक्काम आकु र्डीतील गोदावरी विद्यालय. रात्रीच्या विसाव्यावेळी वारकऱ्यांचे नियोजन कशा प्रकारे असते? त्यांचा दिवस कधी सुरू होतो? व कसा संपतो? वारकरी माऊलीचा जयघोष करत कशा प्रकारे भजनामध्ये तल्लीन होतात? हे टिपण्यासाठी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी वारकऱ्यांसमवेत ‘एक दिवस’ अशा प्रकारचा उपक्रम राबविला. दिंडी म्हणजे एक भगवंताचा परिवार आहे, असे मनात धरून सर्व जण एकमेकांशी आदराचा भाव व्यक्त करत होते. रात्री आठची वेळ. वार मंगळवार. तुकोबारायाचे पालखी प्रस्थान होऊन ठिकठिकाणी दिंड्या विसावल्या. त्यातील आकुर्डी गोदावरी विद्यालयातील दिंडी. विद्यालयात दिंडीने विसावा घेतल्यानंतर सर्व वारकऱ्यांनी गाडीतून सामान बाहेर काढले. विद्यालयाच्या मैदानावरच तळवट टाकून उशाला पिशव्या घेतल्या. थोडा वेळ आराम करून लगेच भजन-कीर्तन सुरू केले. अर्ध्या तासाचा कालावधी लोटल्यानंतर महिला व पुरुषांनी न थकता फुगड्या घालण्यास सुरुवात केली. जवळपास दिंडीत ३०० ते ४०० वारकऱ्यांचा समावेश होता. पाच वर्षांपासून ही दिंडी आकुर्डीत विसावा घेते. थोड्या वेळात टाळ मृदंग व सोबत वीणेकरी व दिंडीप्रमुख यांचे कीर्तन सुरू होते. विसाव्याच्या ठिकाणी बाजूलाच चौक मांडून सर्व जण विसावले. त्या ठिकाणी दिंडी पताका आणि तुळशी ठेवल्या होत्या. जेवणाच्या आधी आरती झाली. संध्याकाळी नऊपर्यंत कीर्तन सुरू होते. त्यानंतर वारकऱ्यांची जेवणाची वेळ झाली. सर्वांनी हात पाय धुऊन ‘वदन कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ भजन म्हणून भोजनास सुरुवात केली. भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्वांनी पुन्हा एकतारी भजन म्हणण्यास सुरुवात केली. अशा प्रकारचे अखंड भजन हे रात्रीचे दोन वाजेपर्यंत सुरू होते. वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दमलेले भाव नव्हते. वारकऱ्यांनी मिळेल तिथे दिलेल्या जागेत झोपण्याची सोय केली. स्वत:चे अंथरूण बॅगेतून काढले आणि भजनाला येऊन बसले. वारकऱ्यांना कसलीही चिंता नव्हती. सर्व काही विसरून भजनात तल्लीन झाले. दिंडीप्रमुख सुनील मानकर यांनीही सर्वांसोबत गाणी व खेळण्याचा आनंद लुटला. मुख्याध्यापक आर. आर. मिश्रा यांनीही वारकऱ्यांची सेवा केली. (प्रतिनिधी)
भगवंताच्या नामस्मरणात रात्र अन् दिवस
By admin | Updated: July 2, 2016 12:45 IST