यावर्षी देशातून सोळा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेच्या आधी दोन-तीन दिवस नीटचा पेपर फुटला अशा अफवा पसरल्या होत्या. त्याच्यावर विश्वास ठेवावा, असे वातावरणही निर्माण झाले. मात्र, नीटची परीक्षा सर्व केंद्रांवर शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सुबत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन क्लासेस लावून आपली तयारी करून घेण्याचा प्रयत्न केला. काहींनी आपापल्या राज्यातील खासगी क्लासेसला पसंती दिली. या सर्व प्रक्रियेत आर्थिक परिस्थिती बेताची असणारे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी इच्छा असूनही योग्य त्या ठिकाणी नीट परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन घऊ शकले नाही. एकूणच शिक्षण ऑनलाइन असून ते सुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे.
यावर्षी भौतिकशास्त्राचा पेपर कठीण होता. रसायनशास्त्रामध्ये थोडेफार कठीण प्रश्न होते. मात्र, जीवशास्त्राचा पेपर सोपा होता. अशा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया होत्या. त्यामुळे मागील वर्षी राज्यांमध्ये ५७० गुणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये जो शेवटचा प्रवेश झाला. तो प्रवेश कदाचित तेवढ्यावरच किंवा थोड्या कमी गुणांवर होईल, असे भाकीत वर्तवले जात आहे. बरेच विद्यार्थी या परीक्षेला अतिशय गांभीर्याने घेत असल्यामुळे वरच्या गुणांमध्ये थोडी तूट येईल. मात्र, ६५० च्या खाली साडेपाचशे गुणांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या राहील. त्यामुळे प्रवेशाचे गणित एआयआर आणि स्टेट रँकिंग आल्यावरच उलगडणार आहे.
जोपर्यंत विद्यार्थी कोणत्या तरी कोचिंग क्लासच्या ताब्यात असतो. तोपर्यंत तो विद्यार्थी उत्तम तयारी करत आहे, असे भासवले जाते. मात्र, अंतिम परीक्षेत त्याचे वास्तव गुण मिळतात. त्यावेळी त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या मूळ तयारीचा अंदाज येतो. त्यामुळे नीटसारख्या परीक्षांची आॅनलाईन पध्दतीने सराव करून घेणाऱ्या संस्थांचा या स्पर्धेच्या युगात खूप उपयोग होतो. त्यातून विद्यार्थ्याला त्याच्या तयारीचा खरा आरसा दाखवला जातो. पुण्यासह राज्यात या दृष्टीने काम करणाऱ्या काही चांगल्या संस्था आहेत.
नीट परीक्षेची काठिण्यपातळी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याच बरोबरीने विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणावर गुण मिळवत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुवतीच्या विद्यार्थ्यांच्या बाहेर ही स्पर्धा निघून गेलेली आहे. मात्र, दहावीत या सर्वसाधारण विद्यार्थ्यांना कुवतीपेक्षा जास्त मिळणाऱ्या गुणांच्या खिरापतीमुळे दिवसाढवळ्या या परीक्षेमध्ये आपण खूप चांगली कामगिरी करू शकू, अशी स्वप्न विद्यार्थ्यांना पडत आहेत. परंतु, केवळ तीन टक्के विद्यार्थ्यांनाच एमबीबीएसला प्रवेश मिळतो. उर्वरित विद्यार्थ्यांच्या नशिबी अपयश येते. आता हे अपयशी योद्धे रिपीटर म्हणून तयारी करतात. त्यामुळे दर वर्षी रिपीटर विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते. यावर्षी देखील प्रवेश मिळवण्यात रिपीटरचाच वरचष्मा राहील, यात वाद नाही.
नीट परीक्षेची काठिण्यपातळी, त्यातील तंत्र आणि तयारीसाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा या विभागीय पातळीवर असल्याने शहरी विभागातील विद्यार्थी या परीक्षेत बाजी मारतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये फारसा वाव नसतो. त्यामुळेच तमिळनाडूमध्ये नुकताच विधानसभेमध्ये कायदा संमत करण्यात आला. त्यानुसार यापुढे नीटच्या माध्यमातून प्रवेश न देता बारावीच्या गुणांवर विद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, केंद्राच्या कायद्याच्या कसोटीवर तो टिकेल याची खात्री नाही.
नीट परीक्षा ही परीक्षा केंद्रीय पातळीवर घेतली जाते. त्यामुळे शहरी विद्यार्थी आणि काही ठराविक राष्ट्रीय पातळीवरच्या कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचाच या परीक्षेवर वरचष्मा राहत असल्याचे दिसून येते. परंतु, त्यामुळे संपूर्ण कनिष्ठ महाविद्यालयांची व्यवस्था त्यामुळे विस्कळीत होते. प्रवेश बोर्डाच्या पातळीवर झाले तर राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांची व्यवस्था अबाधित राहून ग्रामीण विद्यार्थ्यांचा देखील प्रवेशातील सहभाग वाढू शकतो. मात्र, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार हा सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारांमध्ये काही गुण आणि काही दोष सुध्दा आहेत.
ग्रामीण भागात होणारे परीक्षांमधील गैरप्रकार थांबवता आले तर प्रत्येक राज्याच्या कनिष्ठ महाविद्यालयांची दुर्दशा थांबेल. ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळावा, यासाठी बोर्डाच्या गुणांच्या आधारे किंवा राज्याच्या सीईटी सेलमार्फत मेडिकल प्रवेशाची परीक्षा घ्यावी लागेल. अन्यथा भविष्यात खूप मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय पातळीवर कोचिंग क्लासेसची एकाधिकारशाही निर्माण होऊन विद्यार्थी व पालकांची लूट होत राहील. त्यामुळे ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे असेच विद्यार्थी एमबीबीएसला प्रवेश घेऊ शकतील.
- हरीश बुटले, प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक