पुणे : शासनाने पर्यावरणपूरक निर्णय घेण्यासाठी जनतेनेच दबाव आणण्याची गरज आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी धाडसी अप्रिय निर्णय घ्यावेच लागतील, असे माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी येथे सांगितले. सध्याच्या सरसकट परवानग्या देण्याच्या पर्यावरण मंत्रालयाच्या धोरणावरही त्यांनी टीका केली.काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानतर्फे काकासाहेबांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रमेश यांनी ‘भारतापुढील पर्यावरणाची आव्हाने’ या विषयावर विचार मांडले. रमेश म्हणाले, आर्थिक विकास आणि पर्यावरणात नेहमी संघर्ष होत असतो. सरकार हे आर्थिक विकासालाच प्राधान्य देत असते, त्यांनी पर्यावरणाकडे लक्ष द्यावे. त्यासाठी जनतेमधून दबाव निर्माण झाला पाहिजे. देशात दरवर्षी ८० लाख तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. हे रोजगार आर्थिक विकासातूनच निर्माण होणार आहेत. मात्र हा विकास करताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष होता कामा नये. विकास आणि पर्यावरण एकत्र घेऊन जाण्याचे आव्हान आपल्यासमोर असणार आहे. आपला देश चीन, अमेरिकेच्या मार्गाने जाऊ शकणार नाही. त्यांनी ज्या चुका केल्या, त्या आपल्याला परवडू शकणार नाहीत. आम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळा शाश्वत मार्ग निवडावा लागेल.लोकसंख्या १२५ कोटींवर जाऊन पोहचली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न उभा राहिला आहे. दूषित पर्यावरणाचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. पर्यावरण हा जीवनशैलीशी निगडीत विषय बनला आहे. एकंदरीत लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, आरोग्य व जीवनशैलीचा प्रश्न यामुळे पर्यावरणाचे रक्षण करावेच लागेल. भाजपाप्रणीत सरकारकडून अनेक चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. ताडोबामध्ये कोळसा खाणीस परवानगी दिली आहे, असे रमेश यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी धाडसी निर्णयांची गरज
By admin | Updated: February 1, 2016 03:00 IST