पुणे : बीडीपीच्या मुद्द्यावर पक्षाकडून कोणतीच ठोस भूमिका घेतली जात नाही, पक्षातील काही मंडळी बीडीपीबाबतची वैयक्तिक भूमिका पक्षाची भूमिका असल्याचे भासवीत आहेत. त्यामुळे पक्षस्तरावर न्याय मिळत नसल्याचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, विकास दांगट, संगीता कुदळे, लक्ष्मी दुधाणे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नगरसेवक पदाचे राजीनामे दिले आहेत.शहरात बीडीपी आरक्षण लागू व्हावे याकरिता राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण या आग्रही होत्या. राज्य शासनाने नुकताच त्याबाबतचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक नागरिकांना बेघर व्हावे लागणार असल्याने पक्षातील काही नगरसेवकांचा यास विरोध आहे. त्याबातत पक्षाने ठोस भूमिका घ्यावी, अशी त्या नगरसेवकांची इच्छा आहे. त्यामुळे थेट राजीनाम्याचे अस्त्र उपसत त्यांनी बीडीपीच्या मुद्द्यावरून बंडाचा झेंडा उभारला आहे.राजीनामा दिलेले सर्व नगरसेवक हे बीडीपी आरक्षणाच्या भागातील आहेत. बीडीपीमध्ये बांधकाम करण्यास परवानगी मिळावी याकरिता शासनाला वारंवार महापालिकेच्या माध्यमातून भूमिका कळवण्यात आली होती. पक्षाने नेहमीच बीडीपी आरक्षणाविषयी संदिग्ध भूमिका घेतली. त्यामुळे आमच्यावर बीडीपीचे आरक्षण थोपण्यात आले असल्याचा आरोप नगरसेवकांकडून करण्यात आला आहे.शहराध्यक्षांकडून बीडीपी लागू करण्यासाठी नेहमी आग्रही भूमिका घेण्यात आली. पक्षाकडून त्याबाबत काहीच निर्णय घेण्यात आला नाही. शासनाकडून बीडीपीचा योग्य मोबदला देण्याचा विचार केला जात नाही. बीडीपीतील बांधकामे नियमित झाली पाहिजेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये येथील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र नगरसेवकांनी शरद पवार यांना पाठविले आहे.
राष्ट्रवादीच्या ५ नगरसेवकांचे राजीनामे
By admin | Updated: August 18, 2015 03:59 IST