ढाबा मालक राजेंद्र विलास बनकर (वय २५) आणि वेटर तुफान ऊर्फ मीर न्यूटन अली (वय ३२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, माळशिरस (भुलेश्वर) ता. पुरंदर येथील गेल्या महिन्यातील २३ जून रोजी रात्री हॉटेल शिव दरबार ढाबा येथे मयत वेटर दीपक (पूर्ण नाव व पत्ता मिळालेला नाही) याने ढाबा मालकासमोर दारूच्या नशेत उलटी केल्याने मालक राजेंद्र बनकर आणि दुसरा वेटर तुफान अली या दोघांनी चप्पल व काठीने त्याला बेदम मारहाण केली. यात तो निपचित पडला होता. दुसऱ्या दिवशी ही निपचित पडलेला वेटर उठला नाही म्हणून मालकाने त्याला यवत येथे व तेथून पुणे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी त्यांनी मयत वेटर हा अज्ञात इसम असून तो नशेत खाली पडला असून त्याला आम्ही उपचारासाठी घेऊन आलो असल्याचा बनाव केला होता. त्याला रुग्णालयात दाखल करून तेथून लगेच त्यांनी पोबारा केला होता. सदर वेटरचा डोक्याला मार लागून मृत्य झाल्याची खबर ससून रुग्णालयाकडून बंडगार्डन पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. ही घटना जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तो गुन्हा जेजुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. घडलेल्या गुन्ह्याची माहिती घेत असताना माळशिरस परिसरात या घटनेबाबत कुजबुज सुरू होतीच. हाच धागा पकडून जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, माळशिरस बीटचे विपन्ना मुत्तांनवर, सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. एस. कुतवळ, तसेच पोलीस शिपाई अक्षय यादव, संदीप पवार, गणेश कुतवळ आदींचे एक पथक बनवून गुप्त तपास सुरू केला. या तपासात आरोपींनीच हा गुन्हा केल्याची उकल झाली. सदर मयत दीपक वेटर याला पुणे रेल्वे स्टेशन येथून आरोपी राजेंद्र बनकर याने ढाब्यावर वेटर कामासाठी आणलेले होते.
दोन्ही आरोपीना जेजुरी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली असून सासवड न्यायालयाने आरोपींना येत्या ८ जुलैपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे स्वतः करीत आहेत.