पुणे : महापालिकेत नव्याने समावेश होणार्या ३४ गावांच्या अध्यादेशावर हरकती-सूचनांची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होणार आहे. दरम्यानच्या काळात पालिकेच्या विविध विभागाच्या अधिकार्यांना संभाव्य गावांचा बृहद् आराखडा तयार करण्याचे आदेश आयुक्त विकास देशमुख यांनी आज दिले. पालिकेत ३४ गावांचा समावेश करण्याचे गुरुवारी अध्यादेश निघाले आहेत. त्यामुळे महापालिकेचे क्षेत्रफळ जवळजवळ दुप्पट म्हणजे ४६५ चौरस कि.मी. इतके होऊन लोकसंख्येत ८ ते १० लाखांची भर पडणार आहे. आयुक्त देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वाढीव लोकसंख्येच्या सोयी-सुविधांबाबत आढावा बैठक आज झाली. त्यानंतर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. हद्दीलगतच्या गावांतील उपलब्ध साधनसंपत्ती, सेवकवर्ग, मूलभूत सुविधा महापालिकेकडे हस्तांतरण कराव्या लागतील. त्याविषयी पुढील आठवड्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेणार आहे. तसेच, जीपीएसद्वारे भौगोलिक नकाशा तयार करण्यात येणार आहे. पुणे पालिकेचे क्षेत्र मुंबईइतके वाढले तरी मनुष्यबळ मात्र निम्मेही नाही. मुंबई पालिकेत ४.५ हजार अभियंते आहेत, पुण्यात ५०० इतके आहेत. त्यामुळे वाढीव हद्द व लोकसंख्येसाठी सेवा-सुविधांसाठी बृहद् आराखडा पूर्वतयारी म्हणून करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, राज्य शासनाच्या हरकती-सूचनांनंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
समाविष्ट ३४ गावांसाठी ‘स्वतंत्र बृहद् आराखडा’
By admin | Updated: May 31, 2014 07:23 IST