पुणे : मुळशी तालुक्यातील पिरंगुट परिसरात चोर्यांच्या प्रमाणात सातत्याने वाढच होत असून, दुकाने फोडण्याचे सत्र सुरुच असल्याने व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पिरंगुट कॅम्प परिसरात मागील आठवड्यात चोरट्यांनी राजलक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान फोडून जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचा दागिन्यांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेचा तपास सुरु असतानाच चोरट्यांनी सोमवार (ता. २६) रोजी रात्री घोटावडे फाटा येथील स्वामी समर्थ मोबाईल शॉपी व शिंदेवाडी येथील आणखी एक मोबाईल शॉपी फोडून चोरी केली केली. बुधवार (ता. २८) रोजी पुन्हा घोटावडे फाटा येथीलच रस्त्यालगत असलेली गुडलक, सिद्धांत व गणेश ही जवळजवळ असणारी तीन मोबाईल शॉपीची दुकाने फोडून चोरांनी रिचार्ज व्हाऊचर, मेमरी कार्ड, काही नवीन मोबाईल व दुरुरस्तीसाठी आलेले ग्राहकांचे जुने मोबाईल असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. या संदर्भात पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे यांनी पिरंगुट व्यापारी संघाच्या कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेऊन सुरक्षेसाठी चार खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्याची सूचना केली. तसेच या सुरक्षा रक्षकांच्या सोबतीला अधिकचे पोलीस कर्मचारीही तैनात केले जातील असे सांगितले आहे. सध्या दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास कोंडे देशमुख हे करत आहेत. (वार्ताहर)
चोरट्यांच्या रडारवर मुळशीतील दुकाने
By admin | Updated: May 31, 2014 07:19 IST