पुणे : राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) रिक्त पदांचे मागणीपत्रच पाठविले नसल्याने अद्यापपर्यंत २०२१ या सालातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले नाही. असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यावर्षी परीक्षा होणार आहेत की नाहीत या प्रश्नावरुन विद्यार्थी चिंतेत पडले आहेत.
सर्वसाधारणपणे एमपीएससीने २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक डिसेंबर २०२० मध्येच जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र कोरोना, आरक्षण आदी कारणांमुळे घोषित केले नसावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने राज्य पूर्व परीक्षा तब्बल पाच वेळा पुढे ढकलून इतिहास रचला आहेच. मात्र, यंदा परीक्षा होणार आहेत की नाहीत हे या स्पष्ट केले नाही. २१ मार्चला परीक्षा घेऊन कोरोनासारख्या संकटात देखील चांगल्या प्रकारे परीक्षा घेता येते. हे एमपीएससीने दाखून दिले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता फार काळ विचार न करता संबंधित विभागाच्या रिक्त जागांचे मागणीपत्र एमपीएससीला पाठवावे. जेणेकरून वेळापत्रक जाहीर करून अधिकारी होण्याची आस लावून बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी नियोजित अभ्यास करता येईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
काय आहेत अडचणी
- वेळापत्रक जाहीर न केल्याने पुढील नियोजन कसे करणार
- राज्यसेवा पूर्व परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नसल्याने ११ एप्रिलला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’ वर लक्ष केंद्रित
- संयुक्त गट- ‘क’ सेवा परीक्षेची तारीख अद्याप जाहीर नाहीच
- अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर पुढे काय करायाचे, हा मोठा प्रश्न
काय आहेत समस्या
- कोरोना आणि आरक्षणामुळे गेल्या दोन वर्षात भरती प्रक्रिया रखडली.
- वय वाढल्याने संधी हुकली
- वय वाढवले जाणार, केवळ घोषणा झाली मात्र निर्णय नाही.
- मानसिक ताण वाढला असून भविष्य धोक्यात आल्याची भावना.
- अनिश्चित भरती प्रक्रियेमुळे आयुष्याचे गणित बिघडले.
कोट
एमपीएससीनेकडे रिक्त जागांचे मागणीपात्र पाठवावे, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. तसे लेखी पत्रही दिले आहे. किमान वेळापत्रक जाहीर झाले तर विद्यार्थ्यांना परीक्षा होणार आहेत याची खात्री मिळेल. पुढील नियोजन करणे सोपे जाईल.
- महेश बडे, एमपीएससी स्टुडंटस राईट्स
मागील सरकारच्या काळापासून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. या यापूर्वी एमपीएससीने तंतोतंत वेळापत्रकाचे पालन केले होते. त्यामुळे परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली. आरक्षण आणि इतर कारणांमुळे परीक्षा प्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत. यावर गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.
- सतीश खेमणार, परीक्षार्थी
एमपीएससीने २१ मार्च घेतलेली परीक्षा ही २०१९ च्या मागणी पत्रकानुसार घेतलेली आहे. २०२० च्या मागणी पत्रकानुसार होणाऱ्या परीक्षांचे काय, हा मोठा प्रश्न आहे. परीक्षा पद्धतींमुळे खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. वय वाढत असून आईवडिलांना काळजी पडली आहे. वेळापत्रक जाहीर केले तर नियोजन तरी करता येईल.
- मनीषा सानप, परीक्षार्थी