भोसरी : भोसरी परिसरात मुख्य रस्त्यांसह अगदी गल्लीबोळांमध्येही मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याने सर्वसामान्य जनतेला चालताना तसेच वाहनचालकांना वाहने चालवताना फारच मोठी कसरत करावी लागत आहे. या मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांच्या स्वैरपणे हुंदडण्यामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. या सर्व प्रकाराकडे महापालिकेचे मात्र दुर्लक्ष होत असल्यामुळे जनतेत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. भोसरीने गावपण मागे टाकून शहरीकरणाची कास केव्हाच पकडली आहे. मात्र, शहरीकरणाच्या दृष्टीने आवश्यक अशा उपाययोजना विशेष गतीने येथे होताना दिसून येत नाहीत. भोसरीमध्ये रस्ते विकास, उद्याने, पाणी योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. याबाबत नागरिकांमध्ये समाधानही आहे. मात्र, विकसित केलेल्या रस्त्यांसह गल्लीबोळातही मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचे दिवसेंदिवस वाढत असलेले साम्राज्य जनतेची डोकेदुखी ठरत आहे. (वार्ताहर)
मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांना आवरा
By admin | Updated: July 19, 2014 03:30 IST