पुणे : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून येत्या ८ डिसेंबरच्या भारत बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय राज्यातील सर्व बाजार समित्यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती दिलीप मोहिते यांनी ही माहिती पत्राद्वारे दिली. मोहिते यांनी सांगितले की, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कायद्यांना विरोध करण्यासाठी मंगळवारी राज्यातल्या सर्व बाजार समित्या त्यांचे व्यवहार बंद ठेवणार आहेत.
पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र अध्यक्ष राम कदम आणि सचिव राजेंद्र खेडेकर यांनी काढले आहे. आमचा ६० ते ७० टक्के वाहतूक व्यवसाय शेतकऱ्यांवर, मालावर अवलंबून आहे. त्यामुळे आमची सर्व मालवाहतूक कार्यालये, टेम्पो, ट्रक चक्काजाम करून आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश महिला कॉंग्रेस समितीच्या सचिव संगीता तिवारी यांनी मंगळवारच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा देणारे पत्र काढले आहे. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनावणे यांनी पत्रक काढून कृषी कायद्यांविरोधातील भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे. शहराध्यक्ष प्रकाश साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल केदारी आदी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.