पुणे : राज्यातील मराठा व मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षणाची मुहूर्तमेढ कृषी शिक्षणापासून रोवण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने चालू शैक्षणिक वर्षापासून कृषी पदविका अभ्यासक्रमांपासून हे आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मराठा व मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.राज्यात मराठा व मुस्लिम समाजाला चालू शैक्षणिक वर्षापासून अनुक्रमे १६ व ५ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व परिषदेमार्फत राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत कृषी तंत्र पदविका, कृषी तंत्रज्ञान पदविका आणि मत्स्य अभियांत्रिकी पदविका या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी हे आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी २५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला आहे, त्यांना आरक्षणाची सवलत मिळविण्यासाठी जातीचा दाखला, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना कृषी परिषदेचे संचालक यू. आर. कदम म्हणाले, राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार, ९ जुलैपर्यंत ज्या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपली आहे, त्या अभ्यासक्रमांना चालू शैक्षणिक वर्षापासून हे आरक्षण लागू होणार नाही. कृषी पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत ११ जुलै होती, तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश अर्ज करण्याची मुदत २५ जूनलाच संपली आहे. त्यामुळे केवळ कृषी पदविका अभ्यासक्रमांना चालू शैक्षणिक वर्षापासून हे आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
मराठा व मुस्लिम आरक्षणाची मुहूर्तमेढ कृषी शिक्षणापासून
By admin | Updated: July 19, 2014 03:26 IST