पुणे : १९ वर्षांची मुलगी गुन्हे शाखेच्या महिला साहाय्य कक्षामध्ये येते... स्वत:च्या आईविरुद्ध तक्रार अर्ज देते... तक्रार वाचून महिला पोलीस अधिकारीही अचंबित होतात... काय असतं त्या तक्रार अर्जात... तर स्वत:ची आई मित्रासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहू देत नाही अशी तक्रार... गेल्या काही दिवसांत लिव्ह इन रिलेशनशिपबाबतच्या अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने पोलिसांना प्राप्त होत आहेत. सुरुवातीच्या काळात लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर निर्माण झालेल्या शारिरीक जवळिकीचा वापर ‘ब्लॅकमेलिंग’साठीही होत आहे. गेल्या वर्षभरात महिला साहाय्य कक्षामध्ये प्राप्त झालेल्या एकूण १०९८ तक्रारींपैकी २६० तक्रारी लिव्ह इन रिलेशनशिपच्या होत्या.युवक आणि तरुणांच्या दृष्टिकोनामधून ‘अॅडव्हेंचर’ असलेल्या ‘लिव्ह इन’चे दुष्परिणामही यानिमित्ताने समोर येऊ लागले आहेत. या १९ वर्षीय मुलीने तक्रार दिल्यानंतर तिच्याकडे महिला साहाय्य कक्षाच्या पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी चौकशी केली. तेव्हा तिने ‘मी वयात आले आहे, मला माझे निर्णय स्वत: घ्यायचे आहेत. मला मित्रासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे आहे’ अशी उत्तरे दिल्याने पोलीसही चक्रावले. पोलिसांनी समजावल्यानंतरही ही मुलगी आईवर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह करीत आहे. तर दुसरी २0 वर्षांची मुलगी एका विवाहित प्रौढासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहते आहे. एक जोडपे तर ८ वर्षे लिव्ह इनमध्ये होते. आठ वर्षांनंतर मुलाने दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ‘लिव्ह इन’मधील मुलीने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. शेवटी याच दोघांनी लग्नही केले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच एकमेकांच्या स्वभावांना हे दोघेही कंटाळले आणि घटस्फोटासाठी दोघांनीही दावा दाखल केला. आठ वर्षे भावनिक आणि शारीरिक सोबत केलेल्या या दोघांना आता एकमेकांचा चेहराही पाहायचा नाही. आणखी एक जोडपे दहा वर्षे ‘लिव्ह इन’मध्ये होते. वास्तविक त्यातील मुलीचे लग्न झालेले होते. तिने ही बाब मित्रापासून लपवून ठेवली. पतीपासून लग्नानंतर तिसऱ्या महिन्यातच वेगळी राहायला लागलेल्या या मुलीचे लग्न झालेले असल्याचे समजताच तिच्यासोबत दहा वर्षे ‘लिव्ह इन’मध्ये राहणारा मित्र तिला सोडून गेला. त्याने दुसरे लग्न केले. आता ती त्याच्या पत्नीला सोडून माझ्यासोबत रहा, असा आग्रह धरीत आहे. तसा तक्रार अर्जही तिने दाखल केला आहे. स्त्री-पुरुष संबंधांमधील गुंता सोडवून त्यांना आवडीच्या स्त्रीपुरुषांसोबत राहता यावे याकरिता ‘लिव्ह इन’चा प्रकार समोर आला होता. मात्र, हा प्रकारही नातेसंबंधांवर परिणाम करताना दिसत आहे. केवळ शारीरिक आकर्षणच पुरेसे आहे की त्यातली भावनिक गुंतवणूक, हा महत्त्वाचा मुद्दा यानिमित्ताने चर्चेत आला आहे. (प्रतिनिधी)मुला-मुलींनी एकमेकांसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहत असताना भविष्याचाही विचार केला पाहिजे. कारण केवळ शारीरिक गरज पूर्ण होते म्हणून एकत्र राहणे, हा प्रकार घातक आहे. मुलामुलींच्या मित्रमैत्रिणी, ते कोणासोबत राहतात, त्यांचे संबंध कसे आहेत, याची पालकांनीही वेळोवेळी माहिती घेणे आवश्यक आहे. किशोरवयीन मुलांपासून तरुणांमध्ये हे प्रमाण अधिक असल्यामुळे पालकांनी मुलांशी मोकळेपणाने बोलून त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. - प्रतिभा जोशी, पोलीस निरीक्षक, महिला साहाय्य कक्षशिक्षण वा नोकरीनिमित्त राज्यातील अनेक शहरांसह विविध राज्यांमधून तरुण-तरुणी पुण्यात येतात. नोकरीची ठिकाणे, महाविद्यालये, क्लासेस, एकाच भागात अथवा एकाच खोलीवर राहत असल्यामुळे आकर्षणामधून ‘लिव्ह इन’मध्ये राहणे सुरू होते.अनेकदा मुला-मुलींच्या आईवडिलांना याची कल्पनाही असते. मात्र, मुलींकडून लग्नाचा आग्रह होताच जात, धर्म या विषयावरून नकार देतात. त्याहीपेक्षा ‘लिव्ह इन’मध्ये राहिलेल्या मुलीचे चारित्र्य कसे असेल, असे कारण पुढे करीत नकार देतात. गेल्या वर्षभरार पोलिसांकडे आलेल्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या तक्रारींमुळे नातेसंबंधांचा हा प्रकारही वादग्रस्तच ठरत असल्याचे चित्र आहे. आगामी काळात हा आकडा वाढण्याची भीती पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
‘लिव्ह इन’मध्ये टिकेना प्रेम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 03:13 IST