जुन्नर वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या गावांमध्ये अनेक बिबट्यांचे वास्तव्य आहे. वनातील बिबटे भक्ष्याच्या शोधार्थ मनुष्य वस्त्यांकडे फिरकू लागल्याने सन २००१ पासून आजपर्यंत ३४ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. शंभरहून अधिक व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर बिबट्याच्या हल्ल्यात ८ हजार ७२८ पाळीव प्राणी मृत अथवा जखमी झाले आहेत. तर बुधवारी खेड तालुक्यातील वडगाव - पाटोळे गावात एका ज्येष्ठ महिलेवर बिबट्याने हल्ला चढवून अक्षरशः लचके तोडले आहे. वास्तविक या घटनेने खेडसह बिबट्यासदृश गावातील नागरिकांची धांदल उडाली आहे. विशेषतः खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला निदर्शनास येत आहे. त्यामुळे बिबट्याचे मनुष्य व पशुधनावरील हल्ले सातत्याने वाढत चालले आहेत.
दोन्ही तालुके बारमाही बागायती असल्याने बिबट्यासह कोल्हे, ससे, तरस, लांडगे, मोर, रानडुकरे आदी प्राण्यांचा मुक्तसंचार आहे. त्यातच बिबट्याचा लपण्याचा व खाण्याचा उदरनिर्वाह होत असल्याने बराच काळ एकाच ठिकाणी वास्तव्यास राहत आहेत. खेडमधील मरकळ, सोळू, गोलेगाव, संगमवाडी, वडगाव- घेनंद, कोयाळी-भानोबाची, मोहितेवाडी, काळूस, शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, चिंचोशी, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण, कडूस तर शिरूर तालुक्यातील वाजेवाडी, करंदी, केंदूर, वढू, आपटी आदी गावांत बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.
मागील आठवड्यात वडगाव घेनंद परिसरात बिबट्या नर व मादी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर मरकळ गावात दोन ते तीन बिबटे टोळीने फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे. या भागातील वर्पेवस्ती येथे भरदिवसा उसाच्या शेतात दिसले तर, रात्रीच्या सुमारास दोन बिबटे घर परिसरात शिकारीसाठी आल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. कडूस येथे बिबट्याने दोन तरुणांवर, संगमवाडीत गाईच्या दोन वासरांवर, दौंडकवाडी व मरकळला पाळीव प्राण्यांवर, वाजेवाडीत गाईच्या वासरांवर, पोतलेमळ्यात म्हशीच्या पारडावर, वडगावात वासरावर हल्ला केल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यातच वडगाव पाटोळे येथे बिबट्याने महिलेला आपले भक्ष्य बनविल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने काही गावांमध्ये बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे बसवले आहेत. तर काही गावांत जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहेत.
---
खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यात ऊसक्षेत्र वाढल्याने बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच त्यांचा उदरनिर्वाह एकाच ठिकाणी व्यवस्थित होत असल्याने स्थलांतर होत नाही. नागरिकांनी स्वसंरक्षणाचे उपाय शिकले पाहिजे. त्यासाठी वनविभागाकडून आवश्यक ती मदत केली जाईल.
- जयरामे गौवडा, उपवनसंरक्षक अधिकारी जुन्नर