प्रसन्न पाध्येञ पुणेसाहित्य, नाट्य या कलांच्या प्रांतात भाषावाद, सीमावाद नको, असे स्पष्ट मत हेग्गोदूू (कर्नाटक) येथील ज्येष्ठ रंगकर्मी आणि निनासम या नाट्य संस्थेचे सर्वेसर्वा के. व्ही. अक्षरा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.यंदाचे अखिल भारतीय नाट्य संमेलन ६ ते ८ फेबु्रवारी या कालावधीत बेळगाव येथे होत आहे. बेळगावला मराठी, कर्नाटकी नाट्य परंपरा आहे. या भाषांमध्ये तेथे नाटकांचे नियमित प्रयोग होतात. असे असले, तरी अक्षरा यांच्या निनासम या संस्थेला संमेलनाचे निमंत्रण देण्यास नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखेला विसर पडला आहे.शेतकरी कुटुंबातील के. व्ही. सुब्बण्णा यांनी १९४९ साली निनासम या नाट्य संस्थेची स्थापना केली. त्यांचे शिक्षक कविवर्य के. व्ही. पुट्टप्पा यांच्यापासून प्रेरणा घेऊन शेतकऱ्यांचे जीवन व कलात्मक निर्मिती यांची त्यांनी सांगड घातली. हेग्गोदूला परतल्यावर त्यांनी स्वत:चा नाट्यसंच तयार केला. निनासमने आज आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुबण्णा यांचे पुत्र के. व्ही. अक्षरा हे स्वत: नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाचे आणि लीड्स विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत.निनासमने स्वत:ची एक परिपूर्ण कार्यशाळा सुरू केली आहे. त्यातून पदवीधर होणारे कलाकार त्यांच्या फिरत्या नाट्यशाळेबरोबर प्रवास करतात. हेग्गोदूला दर वर्षी शिबिर होते. सर्व नाट्यप्रयोग कन्नड भाषेत होतात. त्यात एक तरी मूळ कन्नड नाटक असते. इतर भाषांतरीत नाटकेही होतात. जगातील भाषांतरित नाटकेही होतात. वर्षाकाठी १५० पेक्षा जास्त नाटके येथे होतात. प्रेक्षकसंख्या ३ लाखांपेक्षा जास्त आहे. दिवसा अरक्क, भात आणि उसाचे पीक घेण्यासाठी राबणारे शेतकरी रात्री सोफोक्लीस, शेक्सपीअर, मोलिएर आणि इब्सेनच्या नाट्यकृती पाहण्यासाठी गर्दी करतात.मराठी-कन्नड स्रेहवर्धन संस्थेतर्फे पुण्या-मुंबईत कन्नड भाषेतील नाट्यप्रयोग सादर केले जात असल्याचे कन्नड भाषेच्या अभ्यासक उमा कुलकर्णी यांनी सांगितले. अनंत मूर्ती यांच्या ‘सूरज का घोडा’ या कथेवर सुमित्रा भावे मालिका करणार होत्या. त्या वेळी कथेतील प्रसंगाप्रमाणे स्थळ पाहण्यासाठी त्यांच्याबरोबर कर्नाटकात गेले होते. त्या वेळी ‘उचल्या’ कादंबरी कन्नडमध्ये अनुवादित करुन त्यांचे नाट्यरूपांतर पाहण्याचा योग आल्याची आठवण कुलकर्णी यांनी सांगितली. ४संमेलन बेळगावात होत आहे आणि सीमाप्रश्नाचा मुद्दा आहे, म्हणून निमंत्रण दिले नसावे असे वाटते का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की कलेच्या प्रांतात असे वाद नको. सीमाप्रश्न हा वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे कलांचा आणि भाषेचा काही प्रश्न येत नाही. कन्नड आणि मराठी भाषेतील नाट्यकृतींचे आमच्या येथे नियमित आदान-प्रदान सुरू आहे. त्यामुळे आमच्यात सीमावादाचा प्रश्न येत नाही. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘गांधी विरुद्ध गांधी’ या आणि इतर काही नाटकांचे भाषांतर करुन प्रयोग सादर केले आहेत.४कर्नाटकातील आघाडीच्या असलेल्या या नाट्यसंस्थेला बेळगावच्या नाट्य संमेलनाचे निमंत्रण मात्र देण्यात आलेले नाही. बेळगावातील नाट्य संमेलनाविषयी अक्षरा यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘बेळगावात नाट्य संमेलन होत असल्याचे वाचण्यात आले. पण आपल्याला या संमेलनाचे निमंत्रण नाही.’’४निनासम या संस्थेला निमंत्रण का दिले नाही, असे विचारले असता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्ष विणा लोकूर म्हणाल्या, ‘‘या संस्थेसंदर्भात आम्हाला स्थानिक पातळीवर काही माहिती नाही. त्यामुळे संस्थेला निमंत्रण दिलेले नाही.’’ ४महाराष्ट्रातील नाट्य परिषदेच्या शाखांना मध्यवर्ती कार्यालयातर्फे निमंत्रण पाठविण्यात आले आहे.