मुलांना योग्य आहार मिळावा, या हेतूने शाळांमध्ये बांधण्यात आलेले किचनशेड बऱ्याच ठिकाणी वापराअभावी पडून आहेत. तर, काही ठिकाणी याचा प्रभावी वापर होत आहे. काही ठिकाणी निधीच मिळाला नसल्याने काही शाळांत शेड उभेच राहिले नसल्याचे ‘लोकमत’ पाहणीत उघड झाले आहे.आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी लाखो रुपये खर्च करून किचन शेड बनविले आहे; परंतु दोन वर्षांपासून किचन शेड वापराविना धूळ खात पडून आहे. अनेक गावांतील बचत गटाच्या महिला शालेय पोषण आहार घरीच शिजवीत असल्याने जिल्हा परिषदेचे लाखो रुपये वाया गेल्याचे पाहावयास मिळत आहे.याबाबत सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे, राज्य शासनाने लहान मुलांना शिक्षणाची आवड लागावी, तसेच लहान मुले निरोगी राहावे म्हणून शालेय पोषण आहार योजना सुरू केला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मात्र आमटी, मसालेभात, खारीक, केळी, चिक्की असे पौष्टिक पदार्थ दिले जातात. हे पदार्थ शाळेत शिजविण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रत्येक शाळेत १ ते दीड लाख रुपये खर्च करून किचन शेड उभारले आहे. किचन शेड उभारून दोन वर्षे होऊन अद्यापही एकदाही या किचन शेडमध्ये पोषण आहार शिजविला गेला नाही. जिल्हा परिषदेचे लाखो रुपये वाया गेले आहे. जिल्हा परिषदेने किचन शेडमध्ये पोषण आहार शिजविण्याची सक्ती करावी. त्यामुळे तांदूळ किती शिजवला जातो. तेल व मसाले दर्जदार वापरले जातात किंवा नाही, यांची खात्री मुख्याध्यापकांना करता येईल.ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील किचन शेडमध्ये पोषण आहार शिजविला जात नाही. अशा बचत गटाचा पोषण आहार शिजविण्याचा परवाना रद्द करावा, याबाबत पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेची तपासणी करावी व मुख्याध्यापकांना पोषण आहार शिजवीत असलेल्या ठिकाणी वारंवार भेट देण्यास भाग पाडावे, अशा सूचना द्याव्या अशी मागणी होत आहे. ९२ शाळा किचनशेडपासून वंचितइंदापूर : तालुक्यातील ४६६ पैकी ९२ शाळांना किचनशेड नाहीत. ९२ पैकी ५२ शाळांना किचनशेड मंजूर आहेत; मात्र २५ टक्के बांधकाम पूर्ण करण्याची संस्थाचालकांची मानसिकता नसल्याने बहुतेक शाळांनी किचनशेड बांधण्याचा प्रस्ताव भरूनदेखील पुढची हालचालच केली नसल्याचे चित्र आहे. सविस्तर वृत्त असे : इंदापूर तालुक्यात ४६६ अनुदानित माध्यमिक व प्राथमिक शाळा आहेत. पहिली ते पाचवीतील २४ हजार ३३५, सहावी ते आठवीतील १६ हजार २६२ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ दिला जातो. ४६६ शाळांपैकी ९२ शाळांकडे किचनशेड नाहीत. या ९२ शाळांपैकी फडतरेवस्ती, सरस्वतीनगर, इंदापूर शाळा क्रमांक ५, चव्हाणवाडी, लुमेवाडी, तोबरेवस्ती, वाघमोडेवस्ती (बोरी) या ७ शाळांना किचनशेडची गरज आहे; मात्र बांधकामाकरिता अडचण येत आहे. यादववस्ती, हेगडेवाडी, नऊदारे, हनुमानवाडी पवारवाडी, काळेलवस्ती, नलवडेवस्ती, निंबोडी, वाबळेवस्ती, बारामती अॅग्रो साखर शाळा या १० शाळांना जागा नसल्यामुळे किचनशेड बांधता येत नाही. गंगावळण व कारंडेवस्ती येथील शाळांचे किचनशेड वाऱ्याने उडून गेले आहे. तर, सरडेवाडी येथील शाळेचे किचनशेड रस्तारुंदीकरणाने गिळून टाकले आहे. जिल्हा परिषदेने ३४७ शाळांना तयार किचनशेड उपलब्ध करून दिली आहेत. ६४ अनुदानित माध्यमिक शाळांपैकी २७ शाळांकडे किचनशेड नाहीत. चार महिन्यांपूर्वी पंचायत समितीने या शाळांकडून प्रस्ताव मागितले होते. त्या शाळांनी प्रस्ताव तयार करून पाठविले आहेत. मात्र, २५ टक्के बांधकाम पूर्ण करण्याच्या अटीची पूर्तता होत नसल्याने किचनशेडचे काम मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबत चालले आहे.
वापराअभावी किचनशेड धूळ खात
By admin | Updated: February 2, 2016 01:02 IST