हणमंत पाटील, पुणेपुणे : निसर्गरम्य कात्रज टेकडीवर ‘हिल्स स्पॉट’, बंगलो प्लॉट, जांभूळवाडी ‘लेक व्ह्यू’ आदी आकर्षक पाट्या जागोजागी उभ्या आहेत. कात्रजच्या आगम मंदिरापासून, अंजनीनगर, गगनगिरी हिल्स, जांभूळवाडी, दरीपूल या भागात टेकड्या पोखरून प्लॉटिंग वेगाने सुरू आहे. महापालिका हद्दीत कात्रज परिसरातील गावांचा समावेश झाल्याने, टेकडीवरील गुंठ्यांचे भाव वधारले असून, खुलेआम विक्री सुरू आहे. गेल्या वर्षी कात्रज डोंगर टेकडीवरून येणाऱ्या पाण्याला अनधिकृत बांधकामे व प्लॉटिंगमुळे अडथळे आले. त्यामुळे शिंदेवाडी येथे पाण्याच्या लोंढ्याने महामार्गावरील एक मोटार वाहून गेली. त्यामध्ये वाडेकर कुटुंबीयातील मायलेकींचा मृत्यू झाला. त्यानंतर कात्रज टेकडीच्या दक्षिण भागात अनधिकृत प्लॉटिंग व बांधकामे करणाऱ्या राठोड बंधूवर कारवाई करण्याचे सोपस्कार प्रशासनाने पूर्ण केले. मात्र, एक वर्षातच या दुर्घटनेचे गांभीर्य विरून गेले आहे. त्यामुळेच कात्रज टेकडी पोखरून प्लॉटिंगच्या कामांना पुन्हा वेग आला आहे. राज्य शासनाने महापालिका हद्दीत गुजरवाडी, निंबाळकरवाडी, आंबेगाव खुर्द व जांभूळवाडीचा समावेश करण्याची अधिसूचना २९ मे रोजी काढली. त्यामुळे कात्रज डोंगर-टेकडीवरील जागांचा भाव वधारला आहे. महापालिका हद्दीत समावेश झाल्याचे सांगत बांधकाम व्यावसायिकांच्या एजंटांने गुंठ्यांचे भाव दुप्पट केले आहेत. आता महापालिकेच्या हद्दीत सर्व टेकडीचा परिसर आल्याने बांधकामाला परवानगी देण्यात येणार असल्याची बतावणी केली जात आहे. ‘लोकमतच्या प्रतिनिधीं’नी प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याची पाहणी केली. त्या वेळी कात्रज टेकडीवर जागोजागी कंपाऊंड वॉल आणि सिमेंटचे खांब लावून प्लॉटिंग दिसून आले. त्याठिकाणी हिल्स स्पॉट, लेक व्हू, निसर्गरम्य अशा जाहिराती व पाट्या ठिकठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. प्लॉटला जाण्यासाठी कात्रज महामार्गाच्या दोन्ही बोगद्यांकडून टेकडी पोखरून रस्ते तयार करण्यात आले आहेत. या कात्रज टेकडी परिसराचा महापालिका हद्दीत समावेश झाल्याने आता ‘एनए’ (अकृषी दाखला)ची गरज नाही. याठिकाणी अगोदर झालेल्या बांधकामाला अभय मिळाले आहे. याठिकाणी मोठे बंगले अगोदर उभारलेले आहेत.
कात्रज हिल विकणे आहे!
By admin | Updated: August 4, 2014 04:27 IST