थ्रीजीचे युग संपताच मोबाईल नेटवर्क जेव्हा फास्ट झाले त्यावेळी मोबाईलचा वापर हा कॉलिंगसाठी कमी आणि इतर ॲप्ससाठी जास्त सुरू झाला. एकीकडे स्वस्तात दिवसाला दीड जीबी इंटरनेट सुविधा देणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली त्याचेवळी दुसरीकडे पोकेमॉन, पब्जी, सीओडी सारख्या गेम्सने छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांवरच भुरळ घातली. टीकटॉकने तर तरुणाईला इतकी भुरळ घातली की त्याचा परिणाम थेट फिल्म, टीव्ही मालिका यांच्यावर झाला आणि गावागावातून टीकटॉक स्टार्सने लोकप्रियतेबाबत सेलिब्रेटींना मागे टाकले. त्यामुळे तरुणाईची हीच क्रेझ पाहत मोबाईल बनविणाऱ्या कंपन्यांनी तशा फिचर्सची भर नवनव्या मोबाईलमध्ये आणायला सुरुवात केली. ही बदल इतका फास्ट झाली की अवघ्या दहा वर्षांत साध्या बटणांच्या मोबाईलवरून आज तब्बल मून फोटोग्राफी करणाऱ्या कॅमेरा फोनपर्यंत मोबाईलने आपले रूप पालटले आहेत.
साध्या मोबाईलने पहिल्यांदा रूप पालटले तेव्हा मोबाईलमधील एफएम रेडिओ आणि विविध ऑडीओ लोकप्रिय झाले. विविध गाणी ऐकण्यासाठी चांगली ऑडिओ क्वालिटी असणाऱ्या मोबाईलला तरुणांनी पसंती द्यायला सुरुवात केली. त्यानंतर जसजसा विविध व्हिडीओ ॲप वाढले तसतसे मोबाईलच्या डिस्प्ले क्वालिटीची क्रेझ आली त्यामुळे टचस्क्रिन किती स्मूथ होते त्यापासून ते त्यावर पिक्चर क्वालिटी सर्वोच्च दर्जाची दिसण्यासाठी ॲमनॉल्ड डिस्प्लेसारखे तंत्र असणाऱ्या मोबाईल घेण्याकडे तरुणाईचा कल वाढला. या साऱ्या दरम्यान मध्येच फ्लिप (घडी करता येणारा) स्मार्टफोनचीही क्रेझ होतीच पण ती जितक्या वेगात आली तितक्या वेगात संपली. जसजसे विविध गेम्स विकसित झाले तसतसे मोठा डिस्प्ले घेण्याकडे कल वाढला त्याशिवाय पब्जी, सीओडीसारख्या गेम्सच्या पुढच्या लेव्हल्स डाउनलोड करण्यासाठी ४-६-८ अशा रॅम्स वाढत गेल्या. अर्थात त्यामुळे शेकडो ॲप्सही अगदी वेगात चालण्यास सुरुवात झाली तर दुसरीकडे व्हीजीए कॅमेरापासून ते २-४-८ मेगा पिक्सल कॅमेराचा प्रवास तब्बल १०० मेगापिक्सलच्या पुढेपर्यंत गेला आहे. हे सारे गेम्स, फोटो, व्हिडीओ आणि ॲप्स मोबालमध्ये ठेवण्यासाठी अर्थात तितक्याच मोठ्या मेमरीची गरज असल्याने मोबाईलच्या इंटनरल मेमरीचा प्रवासही दोन जीबीवरून थेट आता एक टीबीपर्यंत पोचला आहे.
--
केवळ कॅमेरा नव्हे तर डिस्प्ले, रॅम, स्टोरेज बनल्या प्रमुख गरजा या साऱ्या बदलामुळे आज तब्बल दहा हजारांचा स्मार्ट फोनही तरुणांच्या दृष्टीने सामान्य फोन ठरत असून सुमारे १५ ते २० हजारांपासून मिळणाऱ्या फोनला अधिक पसंती मिळत आहे. ज्यामध्ये साधारण १२ मेगा पिक्सल कॅमेरपर्यंत तीन कॅमेरे, ४ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, सुमारे ६.४ इंचाचा मोठा डिस्प्ले या आता मोबाईलच्या प्रमुख गरजा बनल्या आहेत असे चित्र मोबाईल वापरकर्त्यांमध्ये दिसते.