पर्यटन विकासासाठी पर्यावरणाचे नुकसान नको
जुन्नरचे समृद्ध पर्यावरण - 【भाग - ४ 】
पर्यटकांची संख्या वाढली : उपाययोजनांची गरज
खोडद : देशाच्या पश्चिमेकडे पसरलेला गुजरातपासून केरळपर्यंत पश्चिम घाट हा पर्यावरणदृष्ट्या अतिशय संवेदनशील असणारा भाग आहे. या पश्चिम घाटात अनेक पर्वतरांगा आहेत. या पर्वतरांगांमध्ये दुर्गमतेमुळे येथील पर्यावरण सुरक्षित राहिले आहे. पण, येथे येणाऱ्या बेशिस्त पर्यटकांमुळे येथील सुरक्षित राहिलेले पर्यावरण धोक्यात येऊ लागले आहे. पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय व रोजगाराच्या संधी निर्माण होत असली तरी पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची दक्षता या ठिकाणी येणाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.
जुन्नरच्या पश्चिम भागात पठारावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची रानफुले आहेत. अनेक पर्यटक या रानफुलांचे माळ पाहण्यासाठी येत असतात. जुन्नर तालुक्यात दुर्मीळ तसेच नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या वनस्पती, प्राणी, कीटक प्रजाती आढळतात. जुन्नर तालुक्याला जैवविविधता, जंगले, देवराया ही अद्भुत आणि परिपूर्ण अशी निसर्गसंपदा लाभलेली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जैवविविधता महत्त्वाची आहे. जैवविविधतेसाठी निसर्ग संवर्धन व संरक्षण महत्त्वाचे आहे. या सर्वांसाठी सर्वांगीण लोकसहभाग अत्यावश्यक आहे. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि लोकसहभागातूनच आपले पर्यटन व पर्यावरण दोन्हीही बाबतीत प्रगती व समतोल साधता येणार आहे. यासाठी पर्यटनाच्या बरोबरीने येणारे धोके थांबविण्याची गरज आहे.
प्लॅस्टिक बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर, कॅरीबॅगचा वापर, मद्याचा अनिर्बंध वापर, धांगडधिंगा, ध्वनीप्रदूषण व रिकाम्या बाटल्यांचा नैसर्गिक परिसरात व शेतात खच, आदिवासी गावात सांस्कृतिक प्रदूषण, वर्षा सहलींच्या नावाखाली नद्यांच्या उगमातच जैविक व रासायनिक प्रदूषण होत आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमार्फत होणारा जैवसाखळीमधील हस्तक्षेप, जंगलामधील अनधिकृत प्रवेश हे निसर्ग संवर्धनासाठी हानिकारक आहे. या सर्व बाबींचा येथील ग्रामीण संस्कृतीवर व पर्यावरणावर परिणाम होताना दिसत आहे. यामुळे पर्यटन हे अधिक लोकाभिमुख करायला हवे.
काय करायला हवे?
-स्थानिक वनसमित्या स्थापन करणे.
-निसर्गसंपन्न पठारे, जंगले, देवराया, धबधबे इत्यादी ठिकाणी प्रवाशांची संख्या नियंत्रित करणे.
-स्थानिकांमध्ये जबाबदार पर्यटनाबाबत जागरूक करणे व त्यासाठी आग्रही राहण्याची मानसिकता निर्माण करणे.
-स्थानिक महिलांना स्थानिक व पारंपरिक खाद्यपदार्थ व पाककृती करण्यासाठी प्रशिक्षिण देऊन प्रोत्साहित करणे.
-पर्यटनासाठी येताना बाहेरील खाद्यपदार्थ पाकिटे, प्लॅस्टिक सामान पाणी बाटल्या इत्यादी बाबींवर बंदी घालणे.
- स्थानिक युवक व व्यक्तींना गाईड म्हणून सक्षम करणे.
-जागोजागी कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या उपलब्ध करणे व कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे.
कोट
महाराष्ट्र शासनाने सुमारे २०१८ मध्ये जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित केला आहे. ऐतिहासिक, धार्मिक, निसर्ग व कृषी पर्यटन अशाप्रकारे पर्यटनाचे विविध पैलू या तालुक्यात पाहायला मिळतात. पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी पर्यटन नेमके कशा पद्धतीने असावे याची पूर्वतयारी करणे अत्यावश्यक आहे. पण, या नियोजनाबाबत उदासीनता दिसून येते."
- प्रा. राधाकृष्ण गायकवाड, उपाध्यक्ष
जुन्नर तालुका पर्यटन विकास संस्था