बारामती : जंक्शन (ता. इंदापूर) ग्रामपंचायत कार्यालयावर ग्रामपंचायत प्रशासनाने मोठ्या दिमाखात निर्मलग्राम म्हणून लिहिले आहे. परंतु, प्रत्यक्षात जंक्शन गाव सर्वत्र कचऱ्याच्याच विळख्यात सापडलेले आहे. तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून जंक्शनकडे पाहिले जाते. लघुउद्योग आणि स्टील इंडस्ट्रीमुळे जंक्शनचा चेहरा-मोहरा बदलला आहे. येथील उद्योगांमुळे गरजूंना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला. मात्र, गावपातळीवरील स्वच्छतेच्या व आरोग्याच्या सुविधांपासून जंक्शन अद्याप कोसो दूर आहे. पुढील सहा महिन्यांत होणाऱ्या निवडणुकांवर डोळा ठेवून येथील ग्रामपंचायतीने सिमेंटचे रस्ते करण्याचा प्रयत्न केला. हे रस्ते निम्म्यातच सोडून देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने सिमेंटचे रस्ते म्हणजे केवळ देखावाच आहेत. गावामध्ये विटभट्टीच्या शेजारी असणाऱ्या मस्जिदसमोरील सिमेंटच्या रस्त्याच्या मधोमध विजेचे दोन खांब असल्याने वाहनचालकांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागले आहे. हा रस्ता ग्रामस्थांच्या सोयीसाठी आहे का गैरसोयीसाठी, हेच समजत नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. रस्त्याचे काम निकृष्ट आणि नियोजनशून्य असल्याने केवळ ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी रस्त्याचे काम केले गेले का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. भूमिगत गटारांची केलेली कामे अर्धवट सोडण्यात आली आहेत. या गटारींचेही योग्य नियोजन नसल्याने विटभट्टीच्या परिसरात खड्ड्यामध्ये हे सांडपाणी सोडले आहे. (प्रतिनिधी)
‘जंक्शन’ कचऱ्याच्या विळख्यात
By admin | Updated: September 3, 2015 03:08 IST