विश्वास मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी जगाच्या कल्याणा संतांची विभुती, असे वचन सर्वज्ञात आहे. अखिल मानवाचे कल्याणासाठी संतांनी जीवन समर्पिले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे वैभव असणारा आषाढीवारी सोहळा आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात फेसबुक दिंडीच्या निमित्ताने माणसाचे जगणे, जीवन समृद्ध करणारी, समाजभान देणारी तरुणांची वारी सहभागी होणार आहे. या उपक्रमात स्वप्निल मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, अमोल निंबाळकर, ओंकार महामुनी हे तरुण सहभागी झाले आहेत. तरुण महिला सक्षमीकरणावर प्रबोधन करणार आहेत. स्वप्निल मोरे म्हणाले, ‘‘पंढरीची वारी म्हणजे विठ्ठलाला भेटण्याची वारकऱ्यांची आस, पंढरपूरपर्यंत केलेला संघर्षमय प्रवास. साधारणपणे पंढरीची वारी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त केली जाते. माझे आजोबा वारीमध्ये जात होते, त्यांच्या शरीराने साथ द्यायचे सोडल्यानंतर माझ्या वडिलांनी पंढरीची वारी सुरू केली. काही काळानंतर तीच वारी माझ्याकडेही येणार आहे. याच प्रकारे वारीचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतर होते. या भावनेतून आम्ही तरुण काम करीत आहोत. वारीबद्दल अनेक गैरसमज आहेत. वारी हे जीवन समृद्ध करणारी आहे. जीवन घडविण्याची आणि मार्ग दाखविण्याचीही आहे. यंदाची वारी तीची आहे. वारी तिच्या अभिव्यक्तीची, वारी तिच्या जाणिवांची, वारी तिच्या संघर्षाची, वारी तिच्या अस्तित्वाची, वारी तिच्या मुक्तीची, वारी तिच्या स्त्रीत्वाची अर्थात तीची वारी आहे. अभियानातून फेसबुक दिंडी ती आणि तिचा संघर्ष मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.’’ जलसंधारण अभियानांतर्गत मौजे बऱ्हाणपूर आणि मौजे कारखेल ता. बारामती या दोन गावांमध्ये ओढा खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे करण्यात आली. तसेच यावर्षी तरुणांनी महिला सक्षमीकरण, सबलीकरणावर भर दिला आहे. तीची वारी उपक्रम राबविण्यात येणार आहे. वारी कथा आहे एका संघर्षाची, वारी गाथा आहे अस्तित्वाची, वारी प्रवास आहे अंतरंगाचा, वारी कहाणी आहे स्वत्वाची. गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्या, बाल लैंगिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, मासिक पाळी समज गैरसमज, बालविवाह, हुंडा, कौटुंबिक हिंसाचार, विधवांच्या समस्या, रूढी आणि परंपरांमध्ये अडकलेल्या स्त्रिया, वारकरी संप्रदायातील स्त्री संतांचे कार्य, स्त्री अभिव्यक्ती, कर्तृत्ववान स्त्रिया याविषयी प्रबोधन केले जाणार आहे. फेसबुक दिंडीचा सामाजिक प्रबोधनावर भरपंढरीत विठुरायाच्या चरणी एकरूप होण्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराममहाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळा देहू व आळंदीतून मार्गस्थ होणार आहे. हा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने महाराष्ट्राला वारीची आस लागली आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात महाराष्ट्राचा वैभवी सोहळा सातासमुद्रापार अनुभवता यावा, यासाठी संतश्रेष्ठ तुकोबारांच्या वंशपरंपरेतील स्वप्निल मोरे या तरुणाने केला असून गेल्या सात वर्षांपासून फेसबुक दिंडी उपक्रम राबविण्यात येतो.महाराष्ट्रातील वैभव सोहळ्याचे दर्शन इंटरनेटच्या माध्यमातून अखिल विश्वाला घडविण्याचा प्रयत्न केला आहे. पालखी सोहळ्यातील, वारीची वाट, त्याची छायाचित्रे, व्हिडिओ अपलोड केले जातात. वारीचे यथार्थ दर्शन घडविले जाते. वारी हे केवळ आध्यात्मिक नसून सामाजिक भान देणारी आहे. यासाठी फेसबुक दिंडीने प्रयत्न केले आहेत. तसेच सामाजिक भानही जपले आहे.
महिला सक्षमीकरणाचा जागर
By admin | Updated: June 12, 2017 01:30 IST